वसंत साखर कारखाना भाडे तत्त्वावर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:04 PM2018-07-11T22:04:08+5:302018-07-11T22:05:09+5:30
पाच तालुक्यातील १७ हजार ऊस उत्पादकांची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास अध्यक्षांसह संचालक मंडळ राजी झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पाच तालुक्यातील १७ हजार ऊस उत्पादकांची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास अध्यक्षांसह संचालक मंडळ राजी झाले आहे. यासंदर्भात टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.शिवाजीराव जाधव यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे आता कारखाना सुरू होण्याबाबत ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गत वर्षापासून बंद पडला आहे. उमरखेड, महागाव, पुसद, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना अतिशय महत्वाचा आहे. आर्थिक विपन्नावस्थेमुळे बंद असलेला कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरु आहे. हा कारखाना मराठवाड्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्यास इच्छुक आहे. या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव जाधव यांच्यासोबत उमरखेडच्या कृषी महाविद्यालयात बैठक झाली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत पाटील दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथराव कदम, पूर्णा साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव भोसले, विलासराव नादरे, अवंतिका कंपनीचे संचालक किसनराव देवरे, मनोज कनेवार, मधुकर पाष्टे, मोतीराम बोंडे, जितेंद्र महाजन, सुनील बागल, विजय पवार, टोकाई कारखान्याचे एमडी मालेगावकर, चिफ अकाऊंटंट इबितवार, शेतकी अधिकारी अशोक कदम यांच्यासह वसंतचे अध्यक्ष माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर आदी उपस्थित होते.
या सर्व घडामोडीमुळे वसंतवर अवलंबून असलेले १७ हजार सभासद, कामगार, वाहन चालक, पुरवठाधारक व अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
साखर आयुक्तांकडे प्रस्ताव
ऊस उत्पादकांचे पेमेंट, एफआरपी, बँकेचे कर्ज, कामगारांचे वेतन तसेच आजची असलेली स्थिती यावर मात करीत हा कारखाना लवकरच भाडे तत्वावर दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठविला जाईल, असे अॅड. शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.