पुसदमध्ये सायकलपटू धर्माळे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:59+5:302021-04-03T04:38:59+5:30
जागतिक स्तरावर प्रावीण्य मिळवून श्रीरामपूरचे नाव गौरविणारे तसेच वयाची पन्नाशी गाठताना लक्ष गाठणारे गणेश धर्माळे हे पहिले खेळाडू असावे, ...
जागतिक स्तरावर प्रावीण्य मिळवून श्रीरामपूरचे नाव गौरविणारे तसेच वयाची पन्नाशी गाठताना लक्ष गाठणारे गणेश धर्माळे हे पहिले खेळाडू असावे, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे सरपंच आशिष काळबांडे यांनी सत्कारप्रसंगी केले. बर्गामांट टूर डे १०० या जागतिक स्पर्धेत जगभरातून तब्बल चार ९०० स्पर्धक सहभागी होते.
या स्पर्धेत महिन्यातून २० दिवसांची आव्हानात्मक सायकलिंग करावी लागते. सलग पाच महिन्यांत १०० दिवसांची आव्हाने पूर्ण करून धर्माळे यांनी १५ हजार ३०० गुण घेतले. बर्गामांटतर्फे त्यांना प्लॅटिनम पदक, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह, टी शर्ट, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. धर्माळे हे श्रीरामपूरचे रहिवासी आहे. मातोश्री सुभद्राबाई जिल्हेवार विद्यालयात ते शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश आदी राज्यातील सायकल स्पर्धेत प्रावीण्य मिळविले आहे. त्यांच्या यशस्वी कामगिरीने श्रीरामपूरचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झाले आहे. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी अनिल भगत, ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड, बागबान शेख जलील शेख चाँद, मधुकर कलिंदर, बबन नागठाणे, प्रकाश पाईकराव, रवींद्र येळणे, रामराव राठोड, पंकज खाडे, बालाजी टाकरस आदी उपस्थित होते.