‘सूरज’साठी जिल्हाधिकारी बनले ज्ञानदिवा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:55 PM2019-08-13T21:55:22+5:302019-08-13T21:56:17+5:30
आग प्रत्येकाच्याच मनात असते. त्या आगीला चुकीच्या दिशेने हवा दिली गेली तर एक ठिणगी गाव पेटवून टाकते. अन् हवा देणारा समंजस असेल, तर आगीची मशाल होते. क्रांती घडते. शिकू पाहणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्याला परिस्थितीने अडविले.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आग प्रत्येकाच्याच मनात असते. त्या आगीला चुकीच्या दिशेने हवा दिली गेली तर एक ठिणगी गाव पेटवून टाकते. अन् हवा देणारा समंजस असेल, तर आगीची मशाल होते. क्रांती घडते. शिकू पाहणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्याला परिस्थितीने अडविले. मजूर वडिलांच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा दहावीपर्यंतही शिकू शकेल की नाही, अशी अवस्था होती. पण त्याला एका उच्च शिक्षिताने पुढे शिकविले. आज तो विद्यार्थी इंजिनिअर तर झालाच, पण आणखी शिकण्यासाठी तो कालच थेट अमेरिकेला गेलाय. सूरज डांगे हे त्याचे नाव आणि त्याला अंधारातून उजेडापर्यंत बोट धरून आणणारे आहेत यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्याचे राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे!
ही कहाणी सुरू होते २००७ सालापासून. तेव्हा डॉ. हर्षदीप कांबळे यवतमाळात जिल्हाधिकारी होते. त्यांच्या पुढाकारातून यवतमाळात ‘समतापर्व’ हा विचारांचा उत्सव सुरू झाला. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी संपृक्त झालेल्या या उत्सवात एकदा छोटासा ‘सूरज’ उगवला. पण गरिबीच्या अंधाराने त्याचे तेज झाकोळलेले होते. समतापर्वात सूरजला संवेदनशील ‘हर्षदीपा’चा स्पर्श झाला अन् परिवर्तन घडले.
सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातला मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेल्या सूरजचे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सुरू झाले. शिक्षक अशोक राऊत यांनी सूरजची बुद्धिमत्ता हेरली, त्याला प्रोत्साहित केले. पण आयुष्याचे सोने होण्यासाठी एका संधीची गरज असते. एक दिवस ती संधी आली. यवतमाळच्या ‘समतापर्वा’त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विषय होता भारताचे संविधान. सूरजने त्यात भाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रमाण मानून सूरज बोलला. या एका भाषणाने डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सूरजमधला ‘सूर्य’ ओळखला. सूरजला स्पर्धेत पहिला क्रमांक आला. झोपडीतल्या या मुलाच्या पाठीवर थेट जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकाची थाप दिली. कोरडे कौतुक करून थांबणारे डॉ. कांबळे नव्हते. त्यांनी पारितोषिक तर दिलेच, पण या लेकराला आपल्या बंगल्यावर रितसर स्नेहभोजनाचे निमंत्रणही दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे अथक परिश्रमातून शिक्षण घेतले, तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्याचे सार्थक कर, स्वत:चा आणि समाजाचाही विकास कर, हा मूलमंत्र डॉ. कांबळे यांनी दिला. त्यावेळी छोटासा सूरज म्हणाला होता, ‘सर मला मोठे व्हायचे आहे.’ अन् डॉ. कांबळेंनीही त्याला ‘मी तुझ्यासोबत आहे’ अशा शब्दात आश्वस्त केले.
तेथून सुरू झाला सूरजचा उर्ध्वगामी प्रवास. काही दिवसातच बेलोरा (ता. घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सूरजची निवड झाली. दहावीची परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण केल्यावर सूरजला हैदराबादच्या नारायणा महाविद्यालयात आयआयटी जेईईसाठी पाठविण्यात आले. त्यासाठीही डॉ. कांबळे यांनी आर्थिक मदत केली. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही सूरजने उजेडाकडे झेप घेतली. जेव्हा जेव्हा मदत लागली, तेव्हा तेव्हा डॉ. कांबळेंच्या रुपाने एक आयएएस अधिकारी सज्ज होता. आयआयटी केल्यानंतर आता एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमएस करण्यासाठी सूरजला अमेरिकेला जायचे होते. पुन्हा परिस्थिती आडवी आली. पण डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सूरजला थेट मुंबईत बोलावून घेतले. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकण्याचा जो काही खर्च असेल तो करण्याची हमी दिली. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत सूरजला परदेशी जाण्याची परवानगी, पासपोर्ट व इतर गोष्टी करून दिल्या. आणि ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी सूरज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेकडे झेपावला.
आता जगायाचे असे माझे
किती क्षण राहिले
माझ्या धुळीचे शेवटी येथे
किती कण राहिले
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे,
मी मात्र थांबून पाहतो मागे
किती जण राहिले
सुरेश भटांची ही गझल डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासारख्या अधिकाºयांची खालच्यांना वर खेचत झेपावण्याची प्रवृत्ती अधोरेखित करते.
सामाजिक दृष्टिकोनातून डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांमध्ये असणारी प्रशासनातील खुर्ची कशी असावी याचे उत्तम उदाहरण आमचे सर आहेत. त्यांचे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मिळालेले सहकार्य मी कधीही विसरू शकणार नाही.
- सूरज देवानंद डांगे, यवतमाळ
या यशाबद्दल सूरजचा आनंद पाहून मला अधिक आनंद झाला. आम्ही शिक्षण घेण्यासाठी निवडलेल्या ४० मुला-मुलींपैकी तो एक चमकणारा तारा आहे. सूरजने प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रमाने स्वत:ला सिद्ध केले. मी फक्त एक माध्यम होतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेरलेल्या बियाण्याचे हे एक उदाहरण आहे. सूरजला माझा एकच सल्ला म्हणजे स्वत:चा विकास आणि समाजाचा विकास. त्याने स्वत:चे भाऊ आणि समाज विसरू नये.
- डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), विकास आयुक्त (उद्योग)