आठवडी बाजारात जा अन् विजेचे बिल भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:55 AM2018-06-25T10:55:02+5:302018-06-25T10:58:28+5:30
वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ‘मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन’ गावोगावी जाऊन ग्राहकांकडून देयकाची रक्कम स्वीकारणार आहे. शिवाय, मोठे खेडे आणि तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारातसुद्धा ही व्हॅन फिरणार आहे.
या फिरत्या वीज बिल भरणा केंद्रात संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. सोबतच महावितरणचे कर्मचारीही राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जागच्या जागी बिल भरून त्याची पावतीही मिळविता येते. शिवास, गावात व्हॅन आली हे गावकऱ्यांना कळावे म्हणून ध्वनिक्षेपकावरून सूचनाही दिली जाते.
दुर्गम भागातील गावांसोबतच बिल भरणा केंद्र नसलेल्या गावांची त्यात निवड करण्यात आली आहे. शिवाय दाट लोकवस्ती असूनही त्या तुलनेत केंद्रांची संख्या कमी असलेल्या परिसरातही ही व्हॅन फिरविली जाणार आहे. यात ग्रामीण ग्राहकांची जशी सोय होणार आहे, त्याचप्रमाणे महावितरणची वसुली वाढण्यासाठीही मदत होणार आहे. म्हणूनच वसुली क्षमता कमी असलेल्या गावांमध्ये ही व्हॅन फिरविली जाणार आहे. तूर्त राज्यातील निवडक गावांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याचा आढावा तीन महिन्यानंतर घेतला जाणार आहे. प्रतिसाद उत्तम असल्यास व्हॅन अधिकाधिक गावांमध्ये फिरविली जाणार आहे.
यवतमाळच्या तीन गावांची निवड
फिरते वीजबिल भरणा केंद्रांची सुविधा सध्या राज्यातील ५० गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यात विदर्भातील २८ गावांचा समावेश आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन (ता. झरी), शेंबाळपिंपरी (ता. पुसद) आणि अकोला बाजार (ता. यवतमाळ) या तीन गावांमध्ये ‘मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन’ फिरविली जात आहे. ही तीनही गावे तालुकास्थळाच्या तोलामोलाची आहेत, हे विशेष.