भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर लष्करात नायब सुभेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:57 AM2017-11-03T11:57:43+5:302017-11-03T12:02:26+5:30
भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे. २१ वर्षानंतर मिळणारी ही पदोन्नती पाच वर्षातच मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे. २१ वर्षानंतर मिळणारी ही पदोन्नती पाच वर्षातच मिळाली आहे.
गतवर्षी मलेशियात झालेल्या एशियन हॉकी चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर आकाशला शिपाईपदावरून हवालदारपदी बढती मिळाली होती.
यावर्षी बांगलादेश येथील आशिया कप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक आणि आकाशला ‘बेस्ट गोलकीपर आॅफ द टुर्नामेंट’ हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे थेट नायब सुभेदारपदावर पदोन्नती देण्यात आली. पुणे येथे इंडियन आर्मी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये तो हवालदारपदावर कार्यरत आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत एका विशेष समारंभात भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत व लेफ्टनंट जनरल हरपालसिंग यांच्या हस्ते आकाशला ज्युनिअर कमिशंट आॅफिसर (नायब सुभेदार) पदावर पदोन्नती देवून त्याचा गौरव केला.
पुढील लक्ष्य वर्ल्ड हॉकी लिग
आशिया कप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्यानंतर आमचा आत्मविश्वास बळावला आहे. भारतीय हॉकी संघाचे पुढील लक्ष्य भुवनेश्वर येथे होणाऱ्या वर्ल्ड हॉकी लिग व वर्ल्ड कप स्पर्धेवर राहणार आहे, असे आकाशने सांगितले.