दहेली गावकऱ्यांसाठी शेळ्या बनल्या एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:00 PM2019-06-15T22:00:06+5:302019-06-15T22:01:47+5:30
खेड्यातील बाया-माणसांना ऐन गरजेच्यावेळी बरेचदा पैसा उपलब्ध होत नाही. मात्र दहेली गावातील महिलांनी एक-एक पैसा जोडून शेळी पालनाचा व्यवसाय मोठा केला. या व्यवसायातून आता दहेली गावकऱ्यांना हवा तेव्हा पैसा उपलब्ध होऊ लागला आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खेड्यातील बाया-माणसांना ऐन गरजेच्यावेळी बरेचदा पैसा उपलब्ध होत नाही. मात्र दहेली गावातील महिलांनी एक-एक पैसा जोडून शेळी पालनाचा व्यवसाय मोठा केला. या व्यवसायातून आता दहेली गावकऱ्यांना हवा तेव्हा पैसा उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे शेळ्या म्हणजे आमच्या खेड्यातील एटीएमच आहे, अशी भावना गावातील महिलांनी व्यक्त केली.
बचत गटाच्या चळवळीने यवतमाळ तालुक्यातील दहेली गावात हे परिवर्तन घडविले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून येथे शेळी पालनाचा व्यवसाय सुरू झाला. आज प्रत्येक घरात शेळ्या दिसतात. गावाची लोकसंख्या केवळ १२०० आहे. तर शेळ्यांची संख्या मात्र २२०० आहे. सुरुवातीला शेळ्यांच्या जगण्याचे प्रमाण फारच कमी होते. मात्र या पशुसखींनी गावातच बकºयांच्या दुर्धर आजारावर उपचार सुरू केले आहे. त्यामुळे आज गावकºयांच्या लोकसंख्येपेक्षा गावातील शेळ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. शेळ्या विकून कुणी मुलीचे लग्न केले, कुणी आजारपणात उपचाराचा खर्च भागविला. काहींनी आपल्या मुलांना व्यापार सुरू करून दिला. शिवाय बकरीचे दूध, लेंड्या यामुळे शेतजमीनही सुपिक झाली आहे. शेळ्या विकून अडचण भागविणे सर्वांना शक्य झाले आहे.
भिंती केल्या बोलक्या
शेळी पालन नफ्याचा व्यवसाय असला तरी त्यांचे पालन पोषण अवघड आहे. स्वच्छ गोठा, चारा, पाणी, लसीकरण या गोष्टींवर भर द्यावा लागतो. दहेली गावकºयांनी शेळी पालनाला बळ देण्यासाठी गावातील भिंतींवर प्रबोधनपर म्हणी लिहून भिंती बोलक्या केल्या. ‘गरिबा घरची गाय’, ‘लसीकरण करा, आजार पळवा’ अशी म्हणी जागोजागी लिहिल्या आहेत. शेळ्यांवर गावातच उपचार करण्यासाठी वंदना भोंग यांना पशुसखी, शालिनी देठे यांना सहयोगिनी, सुनंदा मानकर यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
शेळी पालनाबाबत दर महिन्याला बैठक होते. शेळ्यांमुळे आर्थिक अडचणी जाणवत नाही. पैशासाठी सावकाराकडे जाण्याची गरज उरली नाही. महिला सक्षम झाल्या.
- वंदना भोंग, पशुसखी दहेली.