गोखीच्या पाण्याची जूनअखेरपर्यंत साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:08 PM2018-05-25T22:08:02+5:302018-05-25T22:08:02+5:30

पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिली आहे.

Goki water till June end | गोखीच्या पाण्याची जूनअखेरपर्यंत साथ

गोखीच्या पाण्याची जूनअखेरपर्यंत साथ

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळकरांनो, रहा बिनधास्त : पण काटकसर गरजेचीच, दररोज मिळते ४० लाख लिटर पाणी

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिली आहे. या प्रकल्पातून दररोज ४० लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे.
गोखी प्रकल्पात सध्या १.१९ दलघमी उपयुक्त जलसाठा तर ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईच्या तीव्रतेला आटोक्यात ठेवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. शहराला दैनंदिन ३०० लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना सद्यस्थितीत या प्रकल्पातून ४० लाख लिटर पाणी मिळत आहे. पाणी अपुरे असले तरी टंचाईत दिलासा देण्यास पुरेसे आहे.
दारव्हा तालुक्यातील गोखी नदीवर पाथ्रड देवी येथे हा प्रकल्प आहे. मूळ उद्देश सिंचन असलेल्या या प्रकल्पातून यवतमाळच्या एमआयडीसीला नियमित पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणाच्या तीरावर जॅकवेल तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी २५० हॉर्सपॉवरचे दोन मोटारपंप लावलेले आहेत. आता या दोन पंपाच्या सहाय्याने दररोज ७० लाख लिटर पाणी उपसले जाते. लोहारा एमआयडीसी स्थित जलशुद्धीकरण केंद्रातून या पाण्याचे वितरण होत आहे. एमआयडीसीतील उद्योगासाठी ३० लाख लिटर तर यवतमाळ शहरासाठी ४० लाख लिटर पाणी दिले जात आहे. या ठिकाणावरून दर्डानगर, सुयोगनगर आणि लोहारा येथील टाकीसोबतच तेथे येणाऱ्या प्रत्येक टँकरला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाणी शुद्धीकरण करून वितरित केले जात असल्याचा दावा एमआयडीसीच्या सूत्रांनी केला आहे.
यवतमाळात पाणी वितरणासाठी ३५ हजार लिटरच्या टँकरचे पाच पॉर्इंट निर्माण केले आहे. त्यावरून छोटे टँकर भरुन शहरात वितरण केले जाणार आहे. पूर्वी एमआयडीसीतील जलशुद्धीकरण केंद्रावर होणारी गर्दी यामुळे नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे.
गोखीच्या मृतसाठ्यातूनही पाणी उपसा करण्याची तयारी केली आहे. सध्या या प्रकल्पात ७.५१ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने तो ३० जूनपर्यंत उपलब्ध क्षमतेने वितरित केला जाईल. टंचाईच्या काळात हा प्रकल्प खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. गरज आहे ती या टंचाईच्या काळात गोखीतून येणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची.

भीषण टंचाईतही उद्योगांना दररोज ३० लाख लिटर पाणी कसे ?
यवतमाळ शहरात १९७१ नंतर पहिल्यांदाच एवढी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आबालवृद्धांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गुंडभर पाण्यासाठी रोजगार बुडवून रात्र जागून काढावी लागत आहे. निळोणा, चापडोह प्रकल्प पूर्णत: आटल्याने आता केवळ गोखी प्रकल्पावर यवतमाळकरांची तहान अवलंबून आहे. त्यामुळे तेथील पूर्ण पाणीसाठा शासनाच्या नियमानुसार केवळ पिण्यासाठी आरक्षित असणे बंधनकारक आहे. मात्र सिंचन विभाग हे बंधन झुगारुन उद्योगांना दररोज ३० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ते पाहता मानवी जीवन वाचविणे महत्वाचे की उद्योग वाचविणे असा प्रश्न निर्माण होत आहे. गोखीतील पाणी साठ्यावर जूनपर्यंत यवतमाळकरांची तहान भागणार आहे. पाऊस वेळेत न आल्यास जूननंतर पाणी संकट गंभीर होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन उद्योगांना दरदिवशी दिल्या जाणाºया ३० लाख लिटर पाणीपुरवठ्याला ब्रेक लावणे अपेक्षित आहे. उद्योगाचे हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करून यवतमाळकरांना अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

Web Title: Goki water till June end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण