लग्न सराईच्या तोंडावर सोने स्वस्त, भाव ३००० ने उतरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 18:09 IST2024-11-25T18:05:50+5:302024-11-25T18:09:12+5:30
दिवाळीत वाढले होते दर : दोन आठवड्यांपासून होत आहे चढउतार

Gold is cheap before Lagna Sarai, the price has come down by 3000
गजानन अक्कलवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : ऐन दिवाळीत ८१ हजारांपर्यंत पोहोचलेल्या सोन्याचा दर आता हळूहळू कमी होत आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये तब्बल साडेचार हजार रुपयांनी सोन्याचा दर खाली आला. आता लवकरच लग्न सराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी सोने घेणे स्वस्तात पडणार आहे.
लग्नसराईत गरीब असो वा श्रीमंत. प्रत्येकांकडून सोन्याचे दागिने कमी- अधिक प्रमाणात का होईना खरेदी केले जातात. प्रत्येक आईवडील आपल्या लाडक्या लेकीसाठी आणि होणाऱ्या जावईबापूसाठी सोन्याचे दागिने घेण्याला प्राधान्य देतात. यासाठी कर्ज काढायचे काम पडले तरी आईवडील मागे-पुढे पाहत नाहीत. बरेचदा लाडक्या लेकीला भेट म्हणूनही सोन्याचे दागिने दिले जाते. ग्रामीण भागात ज्यांच्याकडे विवाह प्रसंग असतो, ते आधीच सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. शेतकऱ्यांना चांगले पिकले तर सोने खरेदीमध्ये उलाढाल पहायला मिळते. यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती फार नाजूक आहे. भावही अपेक्षित मिळालेला नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. अनेकदा शेतकरी अपेक्षित उत्पन्न न झाल्यास आपल्या लेकीचा विवाह पुढे ढकलतात.
पुन्हा भाव वाढणार, ८५ वर जाणार ?
ज्यावेळी सोन्याची मागणी वाढते, त्यावेळी किमतीही वधारतात. आता सोन्याचे भाव कमी होत असले तरी येणाऱ्या काळातील लग्नसराई लक्षात घेता सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. आता कमी झालेले भाव ८५ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नियोजित वधू-वर सराफा दुकानात
दिवाळी झाल्यानंतर विवाहासाठी मुले आणि मुली पाहणे सुरू केले जाते. लग्न जुळल्यानंतर वर आणि वधूसाठी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. त्यामुळे आता नियोजित वर-वधू सराफा दुकानात दिसून येत आहेत.
ट्रम्प जिंकले अन् सोने उतरले
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला बहुमत मिळाले. नियोजित राष्ट्रपती म्हणून ट्रम्प यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येते.
लग्नसराईत रंगत येणार
नियोजित विवाह सोहळे लक्षात घेता आताच सोन्याची खरेदी केल्यास फायद्याचे ठरू शकते. यातून मोठी बचतही होते. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांमुळे रंगत वाढते.
निवडणुकीत सोने खरेदीवर परिणाम?
निवडणूक काळात कर्मचाऱ्यांसह गावागावातील पुढारी व कार्यकर्ते व्यस्त होते. त्यामुळे सोने खरेदीत मंदी असल्याचे दिसून आले. परंतु आता सोने खरेदीत तेजी येण्याची शक्यता आहे.
पोत, बोरमाळ, मोहनमाळची चलती
बिगरडागी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. यामध्ये गोफ, बांगडी, अंगठी, पाटल्या या या वस्तूंचा समावेश असतो. यासोबतच पोत, फॅन्सी बोरमाळ, मोहनमाळ, राणी हार आदींना मागणी आहे.
"अमेरिकेत सत्तापालट होणार आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच शेअर मार्केटमध्ये उतार आल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत."
- रवींद्र कुर्वे, सराफा व्यावसायिक, कळंब