वेळेत उपचार न मिळाल्याने यवतमाळात गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 01:43 PM2020-09-10T13:43:21+5:302020-09-10T13:44:43+5:30

एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Gold medalist doctor dies in Yavatmal due to untimely treatment | वेळेत उपचार न मिळाल्याने यवतमाळात गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने यवतमाळात गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे पाऊण तास भटकत राहिलेदोन रुग्णालयांचा नो-रिस्पॉन्सशासकीय रुग्णालयात मृत घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: येथील एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेख मुश्ताक शेख खलील (४५) रा. पुष्पकुंज सोसायटी, वडगाव यवतमाळ असे या डॉक्टरचे नाव आहे. पुष्पकुंजमध्येच त्यांचे निवासस्थान व शिफा हॉस्पिटल आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता त्यांना हृदयाघात झाला. घाबरल्यासारखे वाटल्याने त्यांनी आपला मदतनीस राम शिरस्कर याला बोलविले व मुलाला सोबत घेऊन दुचाकी वाहनाने ते तिघे जण जवळच असलेल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु तेथे प्रवेशद्वारावरच आम्ही सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण घेत नाही, असे सांगण्यात आले. आपण डॉक्टर आहोत असे शेख यांनी सांगितल्यानंतर एक परिचारिका आली, मात्र तिनेही तेच कारण सांगितले.

त्यामुळे डॉक्टर शेख तेथून येथीलच डॉ. महेश शाह यांच्या शाह हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटरमध्ये पोहोचले. तेथे दार उघडले गेले नाही, तेथे एक म्हातारा गृहस्थ उपस्थित होता. यावेळी डॉ. शेख यांनी डॉ. शाह यांना स्वत: मोबाईलवर कॉल केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेथेच डॉ. शेख कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित केले गेले.

उपचारासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास भटकंती करूनही उपचार न मिळाल्याने एका डॉक्टरलाच जीव गमवावा लागला. या घटनेने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांचीच ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश डॉक्टरांनी कोरोनामुळे सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण घेणे बंद केले. इतर आजाराचेही रुग्ण घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात जावे लागते. रुग्ण न घेण्यासाठी डॉक्टर प्रशासनाच्या एका पत्राचा सतत संदर्भ देतात.

मदतनीसाला रडू कोसळले
एमडी आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट असलेल्या डॉ. शेख यांना उपचारासाठी घेऊन रुग्णालयांमध्ये भटकंती करणारा त्यांचा मदतनीस राम शिरस्कर यांना झालेला प्रकार कथन करताना अक्षरश: रडू कोसळले होते.

ही घटना दुदैवी आहे. असे व्हायला नको होते. रुग्णसेवेसाठी धडपडणाऱ्या एका चांगल्या डॉक्टरला आम्ही मुकलो आहोत.
-संजीव जोशी, अध्यक्ष आयएमए, यवतमाळ.

रुग्णालयांची सारवासारव
दवाखान्यांचे दार ठोठावून उपचार न मिळाल्याने एका डॉक्टरचाच मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संबंधित रुग्णालयांनी सारवासारव सुरू केली आहे. या अनुषंगाने हिराचंद मुणोत क्रिटीकेअर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले. डॉ. मुश्ताक शेख हे क्रिटीकेअर हॉस्पिटलच्या गेटवर आले. त्यानंतर गेटमनने सिस्टरला बोलविले. रुग्णाची अवस्था पाहून सिस्टर डॉक्टरला बोलविण्यासाठी आत गेल्या. मात्र त्यापूर्वीच डॉ. मुश्ताक यांना घेऊन कोणी तरी तेथून निघून गेले. त्यानंतर डॉ. केंद्रे तेथे आले असता पेशंट नसल्याने त्यांनी डॉ. शेख यांना कॉल केला. परंतु तो उचलला गेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. तर डॉ. महेश शाह म्हणाले, आमच्या हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड पेशंट घेतले जात नाही. डॉ. शेख आले तेव्हा त्यांचा विद्यार्थीच आरएमओ म्हणून कार्यरत होता. परंतु त्यांच्यापर्यंत डॉ. शेख यांचा संदेश पोहोचला नाही.

Web Title: Gold medalist doctor dies in Yavatmal due to untimely treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू