बँक लॉकरमधून काढलेले सहा लाखांचे सोने उडविले ; यवतमाळमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 02:11 PM2020-02-13T14:11:09+5:302020-02-13T14:13:42+5:30

एका चोरट्याने सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात बुधवारी सायंकाळी ६ वाजता भरचौकात घडली.

Gold ornaments of 6 lacs stolen ; Events in Yavatmal | बँक लॉकरमधून काढलेले सहा लाखांचे सोने उडविले ; यवतमाळमधील घटना

बँक लॉकरमधून काढलेले सहा लाखांचे सोने उडविले ; यवतमाळमधील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देचोरटा सीसीटीव्हीत कैद दागिने कुठेच सुरक्षित राहिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोन्याचे दागिने अंगावर घातले तरी चोराची भीती, घरात ठेवले तरी चोराची भीती. म्हणून लोक आता बँकांच्या लॉकरमध्ये दागिने ठेवतात. परंतु चोरटे आता लॉकरमधून दागिने काढणाऱ्यांवरही पाळत ठेऊ लागले आहे. अशाच पाळतीतून एका चोरट्याने सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले.
ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात बुधवारी सायंकाळी ६ वाजता भरचौकात घडली. प्रभाकर मोहनराव देशमुख (६१) रा. सिंगद ता. दिग्रस असे यातील फिर्यादीचे नाव आहे. शेतकरी असलेल्या देशमुख यांच्याकडे विवाह समारंभ असल्याने त्यांनी आपले यवतमाळ अर्बन बँकेच्या दिग्रस शाखेतील लॉकरमध्ये असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने बुधवारी काढले. हे दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेऊन ती बॅग आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान दिग्रसमधील एका सलून व्यावसायिकाकडे ते लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. पत्रिका देऊन पाचच मिनिटात परत आले असता रस्त्यावर उभ्या ठेवलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतील सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने क्षणार्धात उडविली. या दागिन्यांची किंमत पाच लाख ७४ हजार रुपये एवढी सांगितली जाते. त्यांनी घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हा चोरटा दिग्रसमधील असावा किंवा एखादवेळी लग्न सोहळ्याबाबत माहिती असल्याने सिंगदमधील असण्याची शक्यताही दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी लोकमतकडे बोलून दाखविली.


बँक ग्राहकांवर चोरट्यांची नजर
ग्राहक बँकेत पैसे टाकायला, काढायला जातो, कुणी ग्राहक दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी जातो. अशा ग्राहकांवर चोरट्यांची कायम नजर असते. अनेक बँकांच्या समोर हे चोरटे वेगवेगळ्या निमित्ताने उभे असतात. कधी ते विक्रेते म्हणूनही दिसतात. ग्राहकाच्या हालचालीवरून त्यांच्याकडे कॅश, दागिने हा ऐवज आहे का याचा अंदाज चोरटे बांधतात. खात्री पटताच त्या ग्राहकाचा पाठलाग केला जातो.

दागिन्यांचा प्रवास असुरक्षित
बँकेतून निघालेल्या ग्राहकाच्या हाती बॅग असेल तर त्याच्या अंगावर तोंडात बिस्कीट खावून थुंकणे, उलटी करणे, तुमच्या अंगावर घाण पडली असे खोटे सांगणे अशी शक्कल लढविली जाते. ग्राहक ते धुण्यासाठी नळावर जाताच चोरटे त्याची बॅग घेऊन पोबारा करतात. बहुतांश बसस्थानकावर असे प्रकार घडतात. दिग्रसमधील या घटनेने आता दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असले तरी या दागिन्यांचा बँक ते घर किंवा घर ते बँक हा प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

 

Web Title: Gold ornaments of 6 lacs stolen ; Events in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.