खुशखबर...१३ लाख पुस्तके आली!
By admin | Published: May 28, 2017 12:48 AM2017-05-28T00:48:01+5:302017-05-28T00:48:01+5:30
शाळा सुरू झाल्यावरही पुस्तके न मिळणे, हा किस्सा यंदा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
तालुक्याला साठा : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शाळा सुरू झाल्यावरही पुस्तके न मिळणे, हा किस्सा यंदा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. कारण महिनाभरापूर्वीच प्राथमिक शाळांची १३ लाख पुस्तके जिल्ह्यात येऊन पोहोचली आहेत. त्यामुळे २७ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या हाती कोरी करकरीत पुस्तके त्यांच्या हव्याहव्याशा सुगंधासह पडणार आहेत.
मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत यंदा एप्रिल महिन्यातच बालभारतीकडे पुस्तकांची मागणी आॅनलाईन नोंदविण्यात आली होती. सर्वशिक्षा अभियानातून जिल्ह्यासाठी २०१७-१८ सत्राकरिता एकंदर १७ लाख ३९ हजार ६५३ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी दोन महिन्यांपूर्वी मागणी नोंदवूनही ऐन शाळा सुरू होता-होता पुस्तके शाळांपर्यंत पोहोचायची. मात्र, यंदा मे महिन्यातच तब्बल १३ लाख १५ हजार ४६० पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. म्हणजेच ७६ टक्के पुस्तकांचा साठा महिनाभरापूर्वीच पोहोचला आहे. उर्वरित ४ लाख २४ हजार १९३ पुस्तकेही पुरवठ्याच्या प्रक्रियेत आहेत. यात बाभूळगाव, झरी जामणी, राळेगाव आणि मारेगाव या तालुक्यांचा पुरवठा बाकी आहे.
शिक्षकांच्या आधी पोहोचणार पुस्तके
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अद्याप खोळंबलेली आहे. ऐन शाळा सुरू होण्याच्या कालावधीत बदल्या झाल्यास शाळेच्या पहिल्या दिवशी आठवडाभरात दुसऱ्या शाळेत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठीची पुस्तके बालभारतीच्या अमरावती डेपोमधून थेट तालुकापातळीवर पोहोचली असून आता शाळांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत. शाळेला शिक्षक मिळण्यापूर्वीच पुस्तके पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा शाळेचा पहिला दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा होणार आहे.