चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:11 PM2018-10-14T22:11:26+5:302018-10-14T22:16:49+5:30
प्रतिभा सगळ्यांमध्ये असते पण, तिची वाढ करायला वातावरण व मार्गदर्शन हवे असते, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रतिभा सगळ्यांमध्ये असते पण, तिची वाढ करायला वातावरण व मार्गदर्शन हवे असते, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने काव्य, कथा, नाट्य व वैचारिक लेखन नवलेखक कार्यशाळा येथे घेण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रा. विलास भवरे अध्यक्षस्थानी होते.
डहाके पुढे म्हणाले, चांगला वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो. लेखकाला जे लिहायचं आहे त्याचे संपूर्ण तपशील न्याहाळावे लागतील. निरिक्षण आणि अध्ययनातून तंत्र समजून घेऊन तंत्रकुशल लेखनाचा स्वीकार करून समाजाचं प्रामाणिकपणे चित्रण करावं लागेल. लोकांना आवडेल असं लेखन करणं अभ्यास, परिश्रम व प्रतिभाशक्तीशिवाय शक्य होणार नाही.
नवलेखक कार्यशाळा तीन सत्रात पार पडली. उद्घाटन सत्राच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथम सत्रात काव्य लेखनावर प्रा.डॉ. पी. विठ्ठल, तर कथात्म वाङ्मयावर डॉ. रवींद्र शोभणे यांनी विवेचन केले. द्वितीय सत्रात नाट्यलेखन कला व तंत्र यावर संजय जीवने यांनी प्रकाश टाकला, तर वैचारिक लेखनावर डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी विस्तृत माहिती दिली. समारोपीय सत्रात कादंबरीकार दिनकर दाभाडे यांनी आपले विचार मांडले. समारोपीय अध्यक्षीय भाषणात प्रा. विलास भवरे यांनी साहित्य प्रकारातील सर्व लेखनाचा मागोवा घेत आपले निरीक्षण मांडले.
मारोती हनवते, अलफिया सैयद, नचिकेत धोटे, राहुल सोनोने, अॅड. संदीप गुजरकर व प्रगती मसराम या प्रवेशार्थिंनी आपला अभिप्राय या कार्यशाळेत व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा.डॉ. युवराज मानकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. संदीप नगराळे व सुनील भेले यांनी दिला. अकादमीचे सचिव आनंद गायकवाड यांनी भूमिका विशद केली. संचालन कवडू नगराळे व सुनील वासनिक यांनी, तर आभार डॉ. सुभाष जमधाडे यांनी मानले. यावेळी अकादमीचे डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, संजय ढोले आदी उपस्थित होते.