चांगले वाचन घडविते चांगला माणूस
By Admin | Published: January 12, 2016 02:17 AM2016-01-12T02:17:55+5:302016-01-12T02:17:55+5:30
माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते.
रमाकांत कोलते : मराठी संवर्धन पंधरवडा
दिग्रस : माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते. म्हणून विद्यार्थ्यांनीही चांगल्या ग्रंथांचं भरपूर वाचन करावे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.रमाकांत कोलते यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत येथील बा.बु. कला, ना.भ. वाणिज्य आणि बा.पा. विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘मराठी वाचन संस्कृती आणि मराठीतील अभिजात ग्रंथसंपदा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.रविकिरण पंडित, डॉ.अपर्णा पाटील होत्या.
प्रा.डॉ.कोलते म्हणाले, संत तुकारामांनी ‘आधी पाठ केली संतांची उत्तरे’ हे प्रांजळपणे सांगितले, तर महात्मा चक्रधरांनी श्रवण पठन मनन हे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सांगतांना वाचनाचे महत्त्व विषद केले. विनोबांनी विचार हाच आचाराचा बाप आहे, असं म्हटलं आहे आणि हा विचार वाचनातून निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी ‘शासन व्यवहारात मराठीचा वापर’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक किरण आडे, द्वितीय अश्विनी गावंडे, तृतीय प्राजक्ता राठोड यांनी पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.गजानन खंडारे यांनी काम पाहिले. या पंधरवडाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)