गोपालकृष्णच्या गजरात दुमदुमली फुलसावंगी
By admin | Published: January 6, 2016 03:18 AM2016-01-06T03:18:00+5:302016-01-06T03:18:00+5:30
हातात टाळ, कपाळावर अबीर बुक्का, रांगेत एका सुरात चालणारे भाविक आणि मुखात राधाकृष्ण, गोपालकृष्णच्या गजरात फुलसावंगीनगरी दुमदुमली.
अभंगाचे स्वर : श्रीमद् भागवत कथेचा समारोप, हरिनामाच्या गजरात गावकरी तल्लीन
फुलसावंगी : हातात टाळ, कपाळावर अबीर बुक्का, रांगेत एका सुरात चालणारे भाविक आणि मुखात राधाकृष्ण, गोपालकृष्णच्या गजरात फुलसावंगीनगरी दुमदुमली. निमित्त होते, श्रीमद् संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ समारोपाचे. जणु फुलसावंगीला पंढरीचेच स्वरुप आले होते.
गत सात दिवस फुलसावंगी येथे श्रीमद् संगीत भागवत कथा यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सकाळपासूनच अभंग आणि गौळणीचे स्वर निणादत होते. अशा या भागवत सप्ताहाचा समारोप सोमवारी झाला. समारोपीय कार्यक्रमाला गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. पंचारती घेऊन समाप्तीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीचे स्वागत करीत होते. या मिरवणुकीत नवारी नेसलेल्या मुली डोक्यावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी घेऊन सहभागी झाल्या होत्या. ‘वासुदेव आला, वासुदेव आला’ असे म्हणत पाच वासुदेव या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महिला पाऊली खेळण्यामध्ये मग्न होत्या, नवयुवक व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराजांना खांद्यावर घेऊन हरिभजनाचा आनंद घेत होते. जणू फुलसावंगीला पंढरीचे स्वरूप आले होते. सकाळी ८ वाजतापासून पुण्यश्वर मंदिराच्या पायथ्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक गावातून प्रदर्शन घालून पुन्हा भागवत ज्ञान मंडपात पोहोचली. त्याठिकाणी मधुकर खोडे महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. सात दिवस रामेश्वर महाराज खोडेंच्या अमृतवाणीतून भागवतकथेचा आनंद घेतला. महाप्रसादाने कथेचा समारोप झाला. या भागवत सप्ताहामुळे सात दिवस गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सकाळ, संध्याकाळ गावात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. (प्रतिनिधी)