गोरीपान राणी जेव्हा ठरवून काळा जोडीदार निवडते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 09:39 PM2020-03-07T21:39:05+5:302020-03-07T21:40:11+5:30
मंडळी आज महिला दिन साजरा करताना महिलांमधील एका मोठ्या परिवर्तनाची ही स्टोरी आपण वाचतोय... नोकऱ्या केल्या, राजकारणात गेल्या म्हणजेच काही महिला सक्षम झाल्या असे होत नाही. माणूस जेव्हा विचारांनी प्रगत होतो, तेव्हाच तो प्रगत मानावा. अशीच वैचारिक उंची गाठणारी ही काहाणी. यवतमाळपासून मुंबईपर्यंतचे स्त्रीजगत ढवळून काढणारी.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रत्येक मुलीच्या स्वप्नातला राजकुमार असतो राजबिंडा, तगडा, गोरापान..! तिच्याही स्वप्नात असाच गोरापान राजकुमार होता. ती तर चक्क ‘राणी’. रुपाचीही अन् गुणांचीही! तिच्या स्वप्नातला जोडीदार तर अत्यंत देखणाच होता. गोरापानच नवरा मिळावा म्हणून तिने चालून आलेली तीन-चार स्थळं धुडकावलीही. पण एक दिवस अचानक तिचे मत पालटले अन् तिने चक्क काळा जोडीदार निवडला... का केले तिने असे? कसा झाला हा बदल?
मंडळी आज महिला दिन साजरा करताना महिलांमधील एका मोठ्या परिवर्तनाची ही स्टोरी आपण वाचतोय... नोकऱ्या केल्या, राजकारणात गेल्या म्हणजेच काही महिला सक्षम झाल्या असे होत नाही. माणूस जेव्हा विचारांनी प्रगत होतो, तेव्हाच तो प्रगत मानावा. अशीच वैचारिक उंची गाठणारी ही काहाणी. यवतमाळपासून मुंबईपर्यंतचे स्त्रीजगत ढवळून काढणारी.
तर... एक आहे मुलगी, राणी तिचे नाव. नागेश्वर भुते यांची ही लाडकी कन्या. खूप शिकली. शिकून कम्प्यूटर इंजिनिअर झाली. मुलीचे वय २७ वर्षांचे झाले म्हणून वडील जावई शोधू लागले. पण राणीच्या मनातला राजकुमार काही सापडेना. तिला हवा होता देखणा, गोरापान पती. सोयरिक घेऊन येणारी मुले कमावती होती, पण रूपानं जरा अशी-तशीच. म्हणून राणीने अनेकांना नकार दिला.
पण मंडळी, परिवर्तन घडविण्यासाठी एखादी साधी गोष्टही मोठे काम करून जाते कधी कधी. तीच गोष्ट राणीच्या बाबतीत एका टीव्ही मालिकेने केली. ‘रंग माझा वेगळा’ ही कहाणी तिने मालिकेत पाहिली. त्यात काळ्या मुलीला नवराच मिळेना. तिची तगमग, कुचंबणा पाहून राणीच्या मनात प्रकाश पडला. अरेच्चा! ही तर आपलीच कहाणी! काळा-गोरा रंग बघण्यापेक्षा माणसाचे गुण पाहिले पाहिजे. मग तिने ठरविले आपण करायचा तर काळाच नवरा करायचा. अन् झालेही तसेच. यवतमाळातीलच अनुराग कवडूजी मिसाळ हा तरुण एक दिवस तिच्या आयुष्यात आला. तोही राणीसारखाच इलेक्ट्रिकल इंजिनियर. शिवाय, जगदंब इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही त्याची स्वत:ची कंपनी असून तो खासगी कंत्राटदार आहे. दोघं एकमेकांशी बोलले. मनं जुळले. अन् वर्णभेदाचे साखळदंड गळून पडले. आता येत्या २२ मार्चला गोरी राणी-काळा अनुराग यांच्या लग्नाचा बार धुमधडाक्यात उडणार आहे.
मालिकेचे कलाकारही चकित!
‘रंग माझा वेगळा’ टीव्ही मालिकेत काळ्या मुलीचा समाजाकडून होणारा दु:स्वास दाखविला जातोय. पण हीच काल्पनिक कहाणी पाहून यवतमाळातल्या एका मुलीने चक्क काळा जोडीदार निवडला, ही बाब कळताच मालिकेतील कलाकारही चकित झाले. त्यांनी राणी आणि अनुरागला चक्क मुंबईत बोलावून मालिकेच्या सेटवर त्यांचा सन्मान केला.