शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:02 PM2018-08-01T22:02:09+5:302018-08-01T22:03:07+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता. याबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: मंजुरी मिळविली आहे.
पश्चिम विदर्भात अकोल्यानंतर यवतमाळातच दुसरे शासकीय कृषी महाविद्यालय होत आहे. या महाविद्यालयाचा फायदा लगतच्या वाशिम, अमरावती व वर्धा जिल्ह्यांना होणार आहे. कृषी महाविद्यालयासाठी ३० हेक्टर जागा लागणार आहे. त्यावर मुख्य प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, संशोधन कक्ष, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, विश्रामगृह उभारल्या जाणार आहे. यासाठी ६३ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. सुरुवातीला या महाविद्यालयात ६० विद्यार्थी संख्या राहणार आहे. शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातच कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून संशोधन कार्य चालणार आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध ज्ञान मिळविण्याचे एक नवीन दालन उपलब्ध झाले आहे. स्थानिक पातळीवरून कृषी संशोधक तयार झाल्याने येथील समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी महाविद्यालयाची मोठी मदत होणार आहे.