शासकीय तूर खरेदीचा पेच
By admin | Published: February 28, 2017 01:26 AM2017-02-28T01:26:09+5:302017-02-28T01:26:09+5:30
खुल्या बाजारात तुरीचे दर कोसळताच शेतकऱ्यांचा लोंढा शासकीय तुर खरेदीकेंद्राकडे वळला.
शेतकरी सभापतींना भेटले : शेतकऱ्यांचा आठ दिवसांपासून मुक्काम
यवतमाळ : खुल्या बाजारात तुरीचे दर कोसळताच शेतकऱ्यांचा लोंढा शासकीय तुर खरेदीकेंद्राकडे वळला. ही गर्दी वाढताच शासकीय तूर खरेदी केंद्र तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे या ठिकाणी मुक्कामास असणाऱ्या शेतकऱ्यांनी संताप नोंदविला. केंद्र बंद असतांनाही दररोज तुरीची आवक वाढत आहे. यामुळे विदर्भ मार्केटींग फेडरेशनपुढे मोजमापाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खुल्या बाजारात तुरीचे दर ३५०० ते ४१०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर शासकीय तूर खरेदी केंद्रावर हे दर ५०५० रूपयाचे दर आहेत. यामध्ये एक ते दीड हजाराची तफावत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लोंढा शासकीय खरेदी केंद्राकडे वाढला आहे. या केंद्रावर तुरीचे मोजमाप तातडीने होण्याची गरज असताना हे केंद्र तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे या ठिकाणची स्थिती आवाक्याबाहेर गेली आहे.
यवतमाळ बाजार समितीमधील केंद्रावर गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसात वेगाने मोजमाप झाले. मात्र शनिवार,रविवार आणि सोमवार या तीन दिवसात एक दाणाही तूर मोजली गेली नाही.
तुरीचे मोजमाप थांबले आहे. या स्थितीत दररोज तुरीची आवक बाजारात वाढत आहे. यामुळे शेडच्या बाहेर खुल्या मैदानात तुरीच्या गंज्या लागल्या आहेत. या प्रकरणी बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक आणि बाजार समिती उपसभापती गजानन डोमाळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (शहर वार्ताहर)
जागेचा प्रश्न सुटेना
मार्केटींग फेडरेशनकडे तूर ठेवायला जागाच नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे यावर अजूनही तोडगा निघाला नाही. मोजमाप करणारे काटे आणि चाळण्याही केंद्रावर नाही यामुळे तुरीची खरेदी होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.