शेतकरी विधवांकडून शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:00 PM2018-01-22T22:00:21+5:302018-01-22T22:00:54+5:30
जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांनी सोमवारी शासनाचा निषेध करीत आपल्या व्यथांना मोकळी वाट करून दिली.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांनी सोमवारी शासनाचा निषेध करीत आपल्या व्यथांना मोकळी वाट करून दिली. चक्रीधरणे आंदोलनात चौथ्या दिवशी त्यांनी सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
चक्रीधरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकरी विधवांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. या सरकारने सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला, अशी भावना व्यक्त केली. शेतकरी विधवांनी घरधनी गेल्यानंतर शेती व कुटुंबाची झालेली दुरवस्था, परवड डोळ्यांत पाणी आणून कथन केली.
या आंदोलनात शेतकरी विधवा इंदुबाई भगवानराव देठे, पारबती माणिक कुडमथे, विमल श्रीराम देहाराकर, जयश्री संजय बोडे, सविता भारत जोगी, वंदना अरुण आडे, रेणुका गजानन सलाम, सुभद्रा रामचंद्र काळे, सारिका मोहन ताजने यांचा समावेश होता. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
चक्रीधरणे आंदोलनात चौथ्या दिवशी सोमवारी दिग्रस विधानसभा मतदार संघातील शेतकरी सहभागी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रवीण देशमुख, प्रफुल मानकर, राहुल ठाकरे, मनीष पाटील, अशोक बोबडे, सुधीर जवादे, बाबासाहेब गाडे, माधुरी अराठे, ओले पाटील, प्रकाश नवरंगे, अशोक भुतडा, धर्मेंद्र दुधे, दिलीप तिमाने, आदींनी केले.