गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:06 PM2019-07-09T22:06:13+5:302019-07-09T22:07:26+5:30

नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Government schemes cover the mothers | गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच

गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच

googlenewsNext
ठळक मुद्देप्रसूती अनुदान : अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांना बुडीत मजुरी, पोषक आहार

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना या काळात मानव विकास मिशनच्या माध्यमातून बुडीत मजुरीचे पैसेही दिले जाणार आहे.
ग्रामीण भागासोबत शहरी मागास वस्त्यांमध्येही कुपोषण पहायला मिळते. ‘हेल्थ इंडेक्स’नुसार अशा माता ‘रेड झोन’मध्ये असतात. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना योग्य आहारही मिळत नाही. मुलही कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी अंगणवाडीतार्इंकडे गरोदर मातांची नोंद घेण्यासह त्यांना पौष्टिक आहार पुरविण्याची जाबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मानव विकास मिशनमध्ये ९ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. तेथील गरोदर महिलांना चार हजार रूपयांची बुडीत मजुरी दिली जाणार आहे. आशा सेविका गरोदर मातांना रूग्णालयात पोहचविणार आहे. त्यांच्या सुकर बाळंतपणाची व्यवस्था झाल्यानंतर तशी नोंद घेतली जाणार आहे. प्रसूती रुग्णालयातच व्हावी यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न गेली काही वर्षात यशस्वी होत आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून यासाठी होणारी जनजागृती महत्त्वपूर्ण ठरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे.

भाग्यश्री योजनेमधून ५० हजार
एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांना माझी कन्या भाग्यश्री योजनेतून महिला बालकल्याण विभागामार्फत ५० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया पालकांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जाणार आहे. हा निधी मुलींच्या नावाने भविष्यासाठी गुंतविला जाणार आहे.
मातृत्व वंदन योजनेतून सहा कोटी
केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून गरोदर मातांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २० हजार गरोदर मातांना आतापर्यंत सहा कोटी रूपयांचा निधी आरोग्य विभागाने तीन हप्त्यात वितरित केला आहे. यासोबत अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी जननी सुरक्षा योजनेतून ७०० रूपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. याकरिता गरोदर मातांना अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे.
लसीकरण, कॅल्शिअमच्या गोळ्या, आहारात कडधान्य
गरोदर मातांना अंगणवाडीमधून तीन महिन्यांपासून ते बाळंतपणापर्यंत आणि बाळ जन्माला आल्यानंतर सहा महिन्यापर्यंत सकस आहार पुरविला जाणार आहे. याकरिता अंगणवाडी केंद्रांना गहू, मसूर, मूगडाळ, चवळी, मटकी, मूग, हळद, मीठ, मिरची आणि तेलाचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबत टी.टी. लस आणि कॅल्शिअम गोळ्या देणे, तसेच बाळाचे लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Web Title: Government schemes cover the mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.