सरकारी जावयांनो, एसी जपून वापरा; शासन काकुळतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:41 PM2018-08-29T12:41:18+5:302018-08-29T12:41:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जनसेवेसाठी ‘मान मोडून’ काम करणारे सरकारी कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसले आहेत. पण ते बसले आहेत, एसीच्या गारेगार हवेत वीजेचा अपव्यय करीत. अखेर या कर्मचाऱ्यांना एसीची हवा आवरा, असे सांगण्यासाठी राज्य शासनाला चक्क जीआर निर्गमित करावा लागला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील बहुतांश कार्यालयांमध्ये वातानुकलन यंत्रणेचा (एसी) वापर होतो. ही सरकारी संपत्ती आहे, असे मानून कर्मचारी-अधिकारी त्याच्या वीज वापरावर फारसे लक्ष देत नाहीत. गरज नसतानाही एसीचे तापमान कमी जास्त केले जाते. मात्र, एसी चालविण्याची विशिष्ट पद्धती आहे.
बहुतांश कार्यालयांमध्ये एसी १८ ते २० डिग्री सेल्सीअस तापमानावर चालविला जातो, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर होत आहे. तोच एसी २४ डिग्री सेल्सीअस तापमानावर ठेवल्यास विजेची २४ टक्के बचत होऊ शकते, असे निरीक्षण केंद्र सरकारच्या ब्युरो आॅफ एनर्जी एफिशिअन्सीद्वारे नोंदविण्यात आले आहे. हेच तापमान मानवी शरीराला आवश्यक आर्द्रता आणि योग्य हवेच्या अभिसरणाकरिता सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बाहेरून कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींना तापमानातील विषम बदलांना सामारे जावे लागत नाही.
या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, विश्रामगृहांमधील एसीचे तापमान २४ डिग्रीच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यासन अधिकारी सं. मु. उत्तरवार यांच्या स्वाक्षरीने हा जीआर शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. शासकीय कार्यालयांसाठी जरी आदेश दिलेला असला, तरी सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्या घरातील, दुकानांतील, कार्यालयांतील एसी जपून वापरल्यास बेलगाम वीज वापरावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.