दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी
By admin | Published: July 3, 2014 11:48 PM2014-07-03T23:48:53+5:302014-07-03T23:48:53+5:30
राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी
यवतमाळ : राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आज दमडीही शिल्लक नाही, तेंव्हा शासनाने ही परिस्थिती समजून घेऊन शेतकऱ्यांना भरीव मागणी करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रांमधले तब्बल तीन नक्षत्र सताड कोरडे गेल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील समस्त बळीराजा हवालदिल झाला असून अस्मानी संकटाच्या साडेसातीत अडकला आहे. राज्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. शेतातील कोंब आलेली बियाणे जळून नष्ट झाली. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अश्रू कोरडे पडलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे अपेक्षेची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे फार मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
त्यामुळेच शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मोफत बियाणे देऊन किंवा दुबार पेरणीसाठी भरीव आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा व त्यांच्यावरचे संकट तत्काळ दूर करावे, अशी महत्वपूर्ण मागणी यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. पावसाळा लांबणीवर पडला असल्याने केवळ शेतकरीच अडचणीत नसून हे एक सामाजिक संकट आहे. त्यामुळे याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात एकटे न सोडता भरीव मदत त्वरित जाहीर करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा आहे.
या बाबत नुकतीच यवतमाळ जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राज्य सरकारकडे रवाना करण्यात आले असून सर्व स्तरातील नागरिकांनीसुद्धा याबाबत जागृत राहून शेतकऱ्यांसाठी भरीव मागणी करण्याचे आवाहन सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बुटे, अध्यक्ष मंगेश वैद्य, श्रीरंग रेकलवार, एम.एम. गुल्हाने, किशोर पोहणकर आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)