कष्टाळू शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:52 PM2018-05-22T23:52:11+5:302018-05-22T23:52:11+5:30

कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे.

Government should tilt for hardworking farmers | कष्टाळू शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे

कष्टाळू शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे

Next
ठळक मुद्देबच्चू कडू : दाभडी येथून प्रहारच्या आसुड यात्रेला सुरूवात, आर्णी शहरात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या दानवाला मानव करण्यासाठी यात्रेच्या समारोपाला भोकरदनमध्ये सर्वांनी यावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.
प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवारी दाभडी येथून आसुड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी आमदार बच्चू कडू बोलत होते. यापूर्वीच्या शासनानेही शेतकऱ्यांची लूटच केली. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग आणला, पण तो पूर्ण लागू केला नाही. त्यामुळे आजचे आणि मागचे दोन्ही सरकार सारखेच आहे. शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण आज उसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात आहे, अशी टीका आमदार कडू यांनी केली.
नोटाबंदी करून देशाचा फायदा झाला नाही. उलट भाजपाच्याच नेत्यांनी यातून मोठा पैसा जमवला. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकडे आजही दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे ‘वोटिंग’ करताना आता विचार केला पाहिजे. यांचे ‘सेटिंग’ उधळत शेतकरी विचाराचे आमदार सभागृहात पाठवावे लागतील. आज तेथे मी एकटा आहे. माझ्यासोबत अजून काही आमदार हवे. त्यासाठीच आसुड यात्रेतून जनजागृती करणार असल्याचे आमदार कडू म्हणाले. काही लोक मुंबईत बसूनच बोलतात. आम्ही थेट मोदींच्या गावात जाऊन आलो. जिथे जखम आहे, तिथेच इंजेक्शन देण्याचे काम प्रहारकडून होईल, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांना स्वप्न दाखविले. तरीही शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दाभडी दत्तक घेऊन विकास करण्याच्या घोषणा आमदार, खासदारांनी केल्या. पण गावात काहीच फरक पडला नाही. प्रहारने शेतकरी, शेतमजुरांना नेहमीच मदत केली. यापुढेही दाभडी गाव आम्ही दत्तक घेऊन समस्या मार्गी लावणार आहोत, अशी घोषणा यावेळी प्रहारचे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी केली.
यावेळी प्रहारच्या पांढरवडाच्या नगराध्यक्ष वैशाली नहाते, कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, जिल्हाध्यक्ष विलास पवार, नितीन मिर्झापुरे, शिक्षक आघाडीचे सुभाष कुळसंगे, तालुकाध्यक्ष नीलेश आचमवार, शहराध्यक्ष अंकुश राजूरकर, श्रीकांत काळे यांच्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक आमदार ‘ठुमक्यात’ मग्न
आसुड यात्रेची सुरवात करताना दाभडी गावातील शेतकऱ्यांनीही आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आपल्या भावना व्यक्त केल्या. दिगांबर गुल्हाने हे शेतकरी म्हणाले, स्थानिक आमदार शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रश्नांकडे लक्ष देत नाही. उलट ते ‘ठुमके’ लावण्यातच मग्न आहेत. नरेंद्र मोदींनी आमच्या गावात येऊन आश्वासन दिले. आज मात्र कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावेळी दाभडी गावातील रूख्मिणी विठ्ठल राठोड या शेतकरी महिलेच्या कुटुंबाला प्रहारकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर शेतकऱ्यांचे ‘काळे दिन’ अजून गेले नाही, म्हणून आपण काळा शर्ट घालून आलो, अशी टीप्पणी आमदार कडू यांनी केली.

Web Title: Government should tilt for hardworking farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.