सरकार देशातील प्रत्येकाला घर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:04 AM2018-11-15T00:04:31+5:302018-11-15T00:05:04+5:30
येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ना.अहीर यांनी केंद्र शासनाने विविध क्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत असल्याचेही स्पष्ट केले. जलयुक्त शिवारसारख्या योजनेमुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात यापुढे कुणीही बेघर राहणार नसून आवश्यक तेथे रस्ता, वीज, पाणी पोहोचविल्याचे सांगितले. देशाच्या सीमेवर तथा देशातही केंद्र सरकार जोरात काम करीत असल्याचे स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे दशाचे चित्र पालटत असल्याचा दावा त्यांनी केला. विविध योजनांमुळे अनेकचे आयुष्यच पालटल्याचे त्यांनी सांगितले. ना.नितीन गडकरी यांच्यामुळे देशात रस्ते विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ना.अहीर यांच्या हस्ते तालुक्यातील २३ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. बांधकाम कारागिरांना साहित्य खरेदीसाठी निधी प्रदान केला. यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध विकास कामांचा आलेख सादर केला.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, ज्येष्ठ नेते उद्धवराव येरमे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे, आर्णी किराणा एसोसिएशनचे भिकूभाई पटेल, विपीन राठोड, बाळासाहेब चावरे, विनीत माहुरे, काँग्रेसचे उद्धवराव भालेराव, भाजपाचे विशाल देशमुख, दीपक वानखेडे यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष उपस्थित होते. संचालन कैलास राऊत, तरा आभार विपीन राठोड यांनी मानले.