शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Published: November 4, 2014 10:48 PM2014-11-04T22:48:12+5:302014-11-04T22:48:12+5:30
वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
नांदेपेरा : वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
पिकांना योग्य दर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने अद्याप पाऊल उचलले नाही. कापूस, सोयाबिनचा लागवड खर्च भरमसाठ वाढला आहे. निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लावगड खर्च आणि दरात तफावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे कापसाला किमान पाच हजार रुपये, तर सोयाबीनला किमान चार हजार रूपये प्रती क्विंटल हमी भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़ शासन दरबारी शेतकरी हिताचा निर्णय तत्काळ मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़
हमी भावासाठी शेतकऱ्यांनाच तडजोड करावी लागते़ शेतकऱ्यांना नेहमी संघर्ष का करावा लागतो, हा संघर्ष आमच्याच पदरी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. दूषित हवामान, वातावरणातील बदल, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी, यामुळे ओढवलेल्या नापिकीने बळीराजा त्रस्त आहे. या आपत्तींमुळे एकरी उत्पादनात घट येऊन उत्पादन खर्चही वाढतो. सध्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल केवळ तीन हजार ५०० रूपये आहे. प्रत्यक्षात कापूस सहा रूपये प्रती किलोप्रमाणे वेचावा लागतो. एका क्विंटलला किमान ६00 रुपये वेचणीवर खर्च होतात. तत्पूर्वी निंदनासाठी किमान १५० रूपये मजुरी, फवारणीसाठी ३०० रूपये, तर लागवडीसाठी किमान हजार रुपयांचा खर्च होतो. तसेच ८०० रुपयांचे बियाणे, दीड हजारांची खते, घ्यावी लागतात. असा एकूण तीन हजार ९५० रुपयांच्या जवळपास खर्च एका क्विंटलसाठी होतो. (वार्ताहर)