शिकणाऱ्या दलित, मुस्लिम विद्यार्थ्यांवर सरकारचा दबाव
By admin | Published: April 1, 2017 12:21 AM2017-04-01T00:21:09+5:302017-04-01T00:21:09+5:30
देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्यक विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत.
एसआयओचा आरोप : शिक्षण संस्थांमधील अत्याचारांविरुद्ध ‘इंसाफ मार्च’
यवतमाळ : देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्यक विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत. विशेष म्हणजे, यात न्याय मागणाऱ्यांना पोलीस, प्रशासन किंवा सरकार काहीही जबाब द्यायला तयार नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या हुशार दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना दबावात आणून त्यांना शिक्षणापासून दूर करण्याची ‘साजीश’ सरकारच करीत आहे, असा आरोप स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाचे (एसआयओ) राष्ट्रीय सचिव सैयद अझरुद्दीन यांनी केला.
मुस्लिम आणि दलित तरुणांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी एसआयओतर्फे विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी सैयद अझरुद्दीन यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि ‘नियत’बाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, १७ जानेवारी २०१६ ला हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्याला व्यवस्थापकांनी रूममधून निघण्याचे आदेश दिल्याने त्याने आत्महत्या केली. १४ आॅक्टोबर २०१६ ला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील नजीब अहमद याला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि दुसऱ्या दिवसापासून नजीब गायब झाला. अशा अनेक घटनांमुळे शिक्षण संस्थेत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लोकशाहीला प्रदूषित करीत आहे. मारपीट, खोटे गुन्हे आमच्या देशातील नवीन पिढीला कलंक लावून देश कमजोर करीत आहे. मुस्लिम युवकांवर खोटे गुन्हे लावून त्यांना कारागृहात दडपून ठेवले जात आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे सैयद अझरुद्दीन म्हणाले.
देशात सरकार बदलताच शैक्षणिक धोरण बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. सरकारच्याच आवाहनानुसार एसआयओने देशभरातून विविध सूचना गोळा करून सरकारकडे दिल्या. मात्र, सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. या सर्व प्रकाराबाबत संघटनेने अडीच लाख स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे अभियान राबविले. त्याला प्रतिसाद मिळून ३ लाख स्वाक्षऱ्या मिळाल्या आहेत. त्या आता सरकारला देणार आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनचे राष्ट्रीय सचिव सैयद अझरुद्दीन, महाराष्ट्र नॉर्थ झोनचे सचिव जावेद इक्बाल, कॅम्पस् सेक्रेटरी तौसिफ खान, शहराध्यक्ष फवाद खान आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
कळंब चौकातून निघाली रॅली
स्टुडंट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र नॉर्थ झोनच्या वतीने यवतमाळ येथे शुक्रवारी इंसाफ मार्च काढण्यात आला. कळंब चौकातून दुपारी अडीच वाजता निघालेली रॅली जिल्ह2ाधिकारी कार्यालयावर धडकली. देशातील विद्यापीठांमध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना थांबवाव्या, अशी प्रमुख मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. या मार्चकरिता एसआयओचे जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि विद्यार्थी आले होते.