उमरखेडमध्ये मुंडण करून शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:52 PM2018-12-01T23:52:35+5:302018-12-01T23:55:00+5:30
पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली. गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली.
गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे. शनिवारी हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तीन दिवसात पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्यात येईल असे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी स्वत: भेट देऊन लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली.
यानंतर आंदोलनाचा १३ वा दिवस असल्यामुळे शासन व प्रशासनाचा निषेध करून शेतकºयांनी मुंडन करून शासनाची तेरवी केली. यात उत्तमराव देवकते, अजब माने, श्रीराम वानखेडे, पांडुरंग कदम, राजू पतंगे, नारायण बेंद्रे, पुंजाराम वानखेडे, काशिनाथ वानखेडे आदींसह १३ शेतकऱ्यांनी मुंडन केले. त्यानंतर तेरवीचे भोजनही देण्यात आले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडलेले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
९० गावांतील शेतकरी
गेल्या १३ दिवसापासून नदी काठावरील विदर्भ आणि मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकरी, नागरिक धरणे आंदोलन करीत आहे. मात्र शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे शासनाची तेरवी करून शासनाचा निषेध म्हणून तेरवीचे भोजन करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाला जागे करण्यासाठी सर्व नागरिकांनी संघटितपणे लढा लढणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला.