बेशरम उंचावून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:18 PM2018-01-19T23:18:21+5:302018-01-19T23:18:37+5:30
संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले.
यावेळी अनेक आंदोलकांनी अंगात पोते घातले होते. गळ्यात बोंडअळीग्रस्त कापसाच्या बोंडांची माळ घातली होती. बेशरमाची झाडे उंचावून लक्षवेधी पद्धतीने सरकारचा निषेध नोंदविला.
जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी तिरंगा चौकात धरणे दिले. १९ ते २५ जानेवारीपर्यंत हे आंदोलन विधानसभा मतदारसंघनिहाय चालणार आहे. दररोज एका मतदारसंघातील शेतकरी या आंदोलनात सहभाग नोंदविणार आहे. शुक्रवारी राळेगाव विधनसभा क्षेत्रातील शेतकºयांनी आंदोलन केले.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना ३० ते ३७ हजार रूपये हेक्टरी मदत घोषित केली. बियाणे कंपन्या, केंद्र शासन, विमा कंपनी यांच्या मदतीने ही रक्कम दिली जाणार आहे. बियाणे कंपन्यांनी मदत देण्यापूर्वीच हात वर केले आहे. तर मोजक्याच शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने नुकसानभरपाई देण्याची कुठलीही घोषणा केली नाही. यामुळे शेतकºयांना मिळणाऱ्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत तत्काळ अदा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी अराठे, अशोक बोबडे, अरुण राऊत, सुधीर जवादे, विलास भोयर, बाबासाहेब गाडे पाटील, प्रकाशचंद छाजेड, दिनेश गोगरकर, बाबू पाटील वानखडे, आनंदराव जगताप, अमित सरोदे, माजी पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी, रिता वाघमारे, निश्चल बोभाटे, शशिकांत देशमुख, राजेंद्र तेलंगे, श्रीकांत कापसे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.