शासकीय जलतरण तलावातील पाण्याविषयी साशंकता कायम
By admin | Published: May 28, 2017 12:51 AM2017-05-28T00:51:28+5:302017-05-28T00:51:28+5:30
जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या ७० ते ८० विद्यार्थ्यांवर अजूनही विविध रुग्णालयात उपचार केले जात आहे.
संसर्गाची भीती : जलतरण प्रशिक्षणार्थ्यांवर उपचार सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या ७० ते ८० विद्यार्थ्यांवर अजूनही विविध रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाण्याच्या संसर्गानेच हे प्रशिक्षणार्थी आजारी पडल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
जिल्हा क्रीडा संकुल समितीमार्फत येथील आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलावाचे संचालन केले जाते. उन्हाळा असल्याने प्रशिक्षणार्थ्यांची संख्या अधिक आहे. ७०० ते ८०० प्रशिक्षणार्थी या तलावात सराव करत आहे. मात्र या तलावात प्रशिक्षण घेत असलेल्या ६ ते १६ वर्षे वयोगटातील प्रशिक्षणार्थ्यांना ताप, हगवण, उलट्या, घशामध्ये फोडं, डोळे पांढरे करणे यासारख्या प्रकाराने त्रस्त करून सोडले आहेत. यातील ७० ते ८० जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. काही जण दोन आठवड्यापासून रुग्णालयात दाखल आहे.
या जलतरण तलावत प्रशिक्षण धेऊन पुणे येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी रवाना झालेले तीन स्पर्धकही आजारी पडल्याने तेथे उपचार घेत आहेत. यवतमाळ शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टरही आता तुम्ही स्विमिंग करताहेत काय, असा प्रश्न विचारत आहे. होकार मिळाल्यास पहिल्या रुग्णावर सुरू असलेल्या उपचारानुसार औषधोपचार केले जात आहे. पालकांनी या संदर्भात कुठेही तक्रार केली नसली तरी, मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी, क्रीडा आयुक्त तसेच पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.