हयातीचा दाखलाच नव्हे, तुम्ही जिवंत आहात, हेही दाखवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 12:22 PM2022-02-03T12:22:52+5:302022-02-03T15:16:00+5:30
श्रावणबाळ निराधार योजना, अपंग, परितक्त्या, संजय गांधी निराधार आणि वृद्ध कलावंत यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ८७ हजारांच्या घरात आहे.
यवतमाळ : वृद्धकलावंत आणि निराधारांसाठी राज्य शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये थेट तहसीलमध्ये जाऊन हयात प्रमाणपत्र स्वत: सादर करण्याच्या सूचना आहेत.
या जाचक अटींमुळे निराधार आणि वृद्धकलावंतांना हेलपाटे सहन करावे लागणार आहे. कोरोनाचा काळ, त्यातही एसटी बंद, खासगी वाहतूक करताना शहराच्या ठिकाणी जाणेही अवघड आहे. शिवाय, अनेकांनी कोरोनाचे डोसही घेतलेले नाही. यामुळे या मंडळींची फरफट होणार आहे. या संदर्भात कलावंत आणि निराधारांनी संताप नोंदविला असून, सवलत आणि बँकेतच हयात प्रमाणपत्र ठीक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्ह्यात १,८७,००० निराधार
श्रावणबाळ निराधार योजना, अपंग, परितक्त्या, संजय गांधी निराधार आणि वृद्ध कलावंत यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ८७ हजारांच्या घरात आहे. या मंडळींना महिन्याला अथवा दोन महिन्यांनी मानधन दिले जाते. त्यासाठी बँकेकडे येरझारा माराव्या लागतात.
कोणाला किती मिळते मानधन?
संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवा महिलेला एक अपत्य असेल तर ११०० रुपये मानधन दिले जाते. दोन अपत्य असेल तर १२०० रुपये दिले जातात. श्रावणबाळ योजनेमध्ये एक हजार रुपये मानधनाची तरतूद आहे, तर वृद्ध कलावंतांना २२०० रुपये मानधन दिले जाते. हे मानधन मिळविण्यासाठी हयात प्रमाणपत्र लागणार आहे.
३१ मार्चपर्यंत दिली शिथिलता
वृद्ध मंडळींना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आम्ही ३१ मार्चपर्यंतचा अवधी दिला आहे. या काळात त्यांना हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. यामुळे वृद्ध, निराधार अशा मंडळींना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय त्यांच्या नातेवाइकांनीही प्रमाणपत्र दिले तरी चालेल.
- सुनंदा राऊत, नायब तहसीलदार, यवतमाळ
पूर्वी बँकेत हयात प्रमाणपत्र दिले जात होते, तेच योग्य होते. आता आम्हाला तहसीलमध्ये काय समजणार.
- बेबी रामटेके, वयोवृद्ध निराधार
सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे तो व्यक्ती हयात आहे की नाही, याची माहिती सरकारला कळते.
- रमेश वाघमारे, वयोवृद्ध कलावंत