वरुणराजाच्या कृपेने बहरला साग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:47 AM2021-08-21T04:47:31+5:302021-08-21T04:47:31+5:30

शहरासह डोंगराळ भागांमध्ये सागाचे काही वृक्ष आजही पहावयास मिळतात. सागाचा वृक्ष हा मोठा विस्तार असलेल्या वृक्षांमध्ये गणला जातो. ऑगस्ट, ...

By the grace of Varun Raja, it blossomed | वरुणराजाच्या कृपेने बहरला साग

वरुणराजाच्या कृपेने बहरला साग

Next

शहरासह डोंगराळ भागांमध्ये सागाचे काही वृक्ष आजही पहावयास मिळतात. सागाचा वृक्ष हा मोठा विस्तार असलेल्या वृक्षांमध्ये गणला जातो. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात साग फुलायला लागतो. पांढऱ्या रंगाच्या फुलोऱ्याने या वृक्षांचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडत आहे. भारतीय प्रजातीमधील हा अतिमहत्त्वाचा पर्यावरणपूरक वृक्ष आहे. सागाची पाने मोठ्या आकाराची असल्यामुळे या वृक्षाची घनदाट सावली पडते.

साग वृक्षाच्या बियांपासून तेल काढले जाते व ते कृमीनाशक म्हणून वापरले जाते. पावसाळ्यात सागाचा वृक्ष अत्यंत सौंदर्यवान दिसतो. साग हा देशी वृक्ष असून, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या परिसरात हा वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो. सागवानी लाकूड दीर्घ काळपर्यंत टिकणारे लाकूड म्हणून प्रसिद्ध आहे. सागाचे वैशिष्ट म्हणजे या लाकडाला सुगंध असून, हा वृक्ष दिसायला सुंदर व भव्य आहे. सागाचे शास्त्रीय नाव ‘टेक्टोना ग्रॅँडिस’ असे आहे.

वनक्षेत्राखाली जमीन आणण्यासाठी साग हा उत्तम वृक्ष आहे. सागाच्या झाडाला पावसाळ्यानंतर येणारी फळे जेव्हा वाळतात व गळून जमिनीवर पडतात तेव्हा त्या फळांमधील बियांचा प्रसार होऊन रोपनिर्मिती होते. हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होते. सागाच्या बिया भिजून ठेवत त्याचे पाणी पिल्याने लघवी साफ होेते. पालवी फुटल्यानंतर सागाच्या कोवळ्या पानांची भाजीदेखील केली जाते.

महाराष्ट्रात विदर्भामध्ये साग मोठ्या प्रमाणात आढळतो. पाण्याचा निचरा होणारा, जमिनीत हे झाड चांगल्या प्रकारे वाढते. या वृक्षाला पावसाळ्यात आलेल्या फुलोऱ्याकडे मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. या वृक्षांच्या पानांच्या पाठीमागे कोळी हा कीटक पोसला जातो. कोळी किटकाची उत्पत्तीदेखील मोठ्या प्रमाणात होते.

‘सनबर्ड’ हा कोळी कीटक खाण्यासाठी आवर्जून सागाच्या वृक्षावर हजेरी लावतो. त्याचप्रमाणे चष्मेवाला, मुनिया, टोपीवाला, कोतवाल आदी लहान पक्ष्यांचा या वृक्षावर वावर असतो. जंगल संवर्धनासाठी साग हा अत्यंत उत्तम प्रजातीचा वृक्ष आहे. एकूणच सागाचे लाकूड ज्याप्रमाणे टिकाऊ आहे, त्याप्रमाणे हा वृक्ष पर्यावरण व जैवविविधतेचे संवर्धन करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतो.

बॉक्स

इंग्रजांनाही साग वृक्षांनी केले आकर्षित

भारतात जेव्हा इंग्रजांची सत्ता होती तेव्हा, त्यांनाही सागाच्या जंगलांनी आकर्षित केले होते. इंग्रजांकडून सागाच्या जंगलांची वर्गवारी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी जंगलांमधून मोठ्या प्रमाणात साग इंग्लंडच्या दिशेने निर्यात केला; मात्र साग निर्यातीबरोबरच त्यांनी साग प्रजातीचे जंगल टिकविण्याबाबतही गांभीर्य दाखविले. ज्या जंगलातून सागाची वृक्षे तोडली, त्याबरोबरच दुसऱ्या जागेत वृक्षांची लागवडदेखील करण्यावर इंग्रजांनी भर दिला. त्यामुळे त्यांना सागापासून उत्पन्न मिळत राहिले.

१५० वर्षांच्या सत्तेत इंग्रजांनी सागाचे संवर्धन व निर्यात, अशा दोन्ही बाबींमध्ये संतुलन राखले. एकूणच सागाचे महत्त्व इंग्रजांच्याही लक्षात आले होते. सागाच्या टिकाऊपणाबाबत इंग्रजही आश्चर्यचकीत झाले होते.

Web Title: By the grace of Varun Raja, it blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.