धान्य चोरीला गोदामातूनच फुटतात पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 05:00 AM2021-11-07T05:00:00+5:302021-11-07T05:00:29+5:30

यवतमाळ शहरातील शासकीय धान्य गोदामात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा छडा लावण्यात आला. धान्याची चोरी गोदामातूनच होत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली. शासकीय गोदामात परवानाधारक दुकानदारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे धान्य मोजून दिले जाते. हे धान्य मोजण्यासाठी अजूनही परंपरागत तराजूचाच वापर केला जातो. यात दांडीला झटका दिल्याने अर्धा किलो, अधिकाऱ्याच्या वाट्याचे एक किलोचा दगड थेट पोत्याच्या बाजूने ठेवला जातो. ही चोरी राजरोसपणे सुरू आहे.

Grain theft breaks out of the warehouse | धान्य चोरीला गोदामातूनच फुटतात पाय

धान्य चोरीला गोदामातूनच फुटतात पाय

Next

सुरेंद्र राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाकडून गरिबांसाठी मोफत व सवलतीच्या दरात धान्य वितरित केले जाते. या योजना केंद्र व राज्य सरकार राबवितात. भरमसाठ धान्य शासकीय गोदामात येते. या गोदामात धान्य वितरित करताना मापात पाप केले जाते. परवानाधारक दुकानदारांना ही फसगत उघड्या डोळ्याने बघण्याशिवाय पर्याय नाही. नंतर काही जण हाच कित्ता परवाना दुकानातून धान्य वितरण करतानाही गिरवतात. 
यवतमाळ शहरातील शासकीय धान्य गोदामात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा छडा लावण्यात आला. धान्याची चोरी गोदामातूनच होत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली. शासकीय गोदामात परवानाधारक दुकानदारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे धान्य मोजून दिले जाते. हे धान्य मोजण्यासाठी अजूनही परंपरागत तराजूचाच वापर केला जातो. यात दांडीला झटका दिल्याने अर्धा किलो, अधिकाऱ्याच्या वाट्याचे एक किलोचा दगड थेट पोत्याच्या बाजूने ठेवला जातो. ही चोरी राजरोसपणे सुरू आहे. याशिवाय ज्या परवानाधारक दुकानदाराकडे अधिकचे लाभार्थी आहेत, त्यांच्याकडे धान्याचे शंभरच्या जवळपास कट्टे जातात. अशा कट्ट्यांमध्ये  दहा ते बारा किलो धान्य कमी दिले जाते. त्यामुळे लाभार्थी संख्येनुसार धान्याची तूट झालेली असते. ही तूट काही परवानाधारक सहन करतात, तर काही जण आपणच कशाला नुकसान करून घ्यायचे, म्हणून लाभार्थ्यांच्या हक्काच्या  धान्याला कात्री लावतात. थम्ब लागत नाही, लिंक नाही, थम्ब देऊन द्या, नंतर धान्य घेऊन जा, अशी एक ना अनेक कारणे सांगून टाळले जाते. गरीब लाभार्थ्यांचे शोषण करण्याची ही मालिका सातत्याने सुरू आहे. इमाने इतबारे काम करणाऱ्या रेशन परवानाधारकांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर टाकला. मात्र, कुठलीच कारवाई झाली नाही. तक्रार केल्यास आपला परवानाच अडचणीत येईल, या भीतीने पुढे येत नाहीत. 

५० किलोत अडीच किलो धान्याची तूट 
- शासकीय गोदामातून धान्य मोजून देताना ५० किलो कट्यात अडीच किलो धान्य कमी दिले जाते. तराजूला पोते मोजण्याच्या बाजूने कापडात एक किलोचा दगड बांधला जातो. नंतर दांडीच्या नावाखाली मोजताना झटका दिला जातो. यात अर्धा ते पाऊण किलो धान्य कमी होते. याशिवाय रिकाम्या पोत्याचे वजन ६५० ग्रॅम इतके भरते, तेही ग्राह्य धरले जात नाही. ४८ किलो ६०० ग्रॅम इतक्या वजनाचेच धान्य एका कट्ट्यात ५० किलो म्हणून दिले जाते. 

गोदामात इलेक्ट्रॉनिक्स काटे का नाहीत?
- धान्याची चोरी करता यावी, म्हणून शासकीय गोदामात आजही परंपरागत तराजूचाच वापर केला जातो. सर्वत्र डिजिटल वजन काटे लागलेले आहेत. रेशन वितरण करणाऱ्या परवानाधारक दुकानदारांनाही डिजिटल वजन काटे वापरण्याची सक्ती आहे. शासकीय गोदामात मात्र डिजिटल काटे अद्यापही लागलेले नाही. यामुळे चोरीचा प्रकार सुरूच आहे. या प्रकारात अधिकारीच गुंतलेले असल्याने तक्रार देण्यास कुणीही पुढे येवून बोलायला तयार नाही. 

 

Web Title: Grain theft breaks out of the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.