ग्रामपंचायत कर्मचारी समायोजन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:26 PM2018-01-17T23:26:42+5:302018-01-17T23:26:54+5:30
नगर परिषदेच्या विस्तारात ७ ग्रामपंचायतींचे समायोजन करण्यात आले. याप्रक्रियेला २२ जानेवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहे. ग्रामपंचायतीत नियमित कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत नगर परिषदेत समायोजित केलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगर परिषदेच्या विस्तारात ७ ग्रामपंचायतींचे समायोजन करण्यात आले. याप्रक्रियेला २२ जानेवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहे. ग्रामपंचायतीत नियमित कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत नगर परिषदेत समायोजित केलेले नाही. या कर्मचाऱ्यांमागे कामाचा मोठा व्याप असून त्यांच्या वेतनात मोठी तफावत आहे. हा अन्याय दूर व्हावा यासाठी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासकीय स्तरावर कुठलीच कारवाई झाली नाही. यामुळे २१९ कर्मचाºयांनी २२ जानेवारीपासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नगर परिषदेत शहरालगतची वडगाव, उमरसरा, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, भोसा या ग्रामपंचायतींचे विलीनिकरण करण्यात आले. त्यासोबचत नगर परिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही सामावून घेणे अपेक्षित होते. मात्र दोन वर्ष लोटूनही नगर पालिका ग्रामपंचायतीच्या वेतनातच या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहे. समायोजन न झाल्याने पालिकेतील इतर कर्मचाºयांना असलेली कुठलीच सोयी-सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. याउलट कामाचा व्याप वाढला आहे. दुप्पट काम करूनही सापत्न वागणूक दिली जात आहे.
ग्रामपंचायतीमधून ७ विभाग प्रमुख, वर्ग ३ चे लिपिक, वर्ग ४ चे सफाई कामगार अशा २१९ जणांना नगर परिषदेत कामाला जुंपण्यात आले आहे. हे कर्मचारी नगर परिषदेत पूर्णवेळ नियमित कर्मचारी म्हणून राबत आहे. आर्थिक लाभ व वेतन वाढ तसेच ग्रामपंचायतीच्या विभागानुसार पदस्थापना न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘बिन पगारी फुल अधिकारी’ म्हणून हे कर्मचारी राबत आहेत. या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व शासनस्तरावर सातत्याने पाठपुराठा केला. मात्र केवळ आश्वासन देवून त्यांना टाळण्यात आले.
दोन वर्षांपासून प्रतीक्षाच
सलग दोन वर्ष प्रतिक्षा करूनही कुणीच न्याय दिला नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाला २२ जानेवारीपर्यंत अल्टीमेटम दिला असून यापुढे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.