ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 09:53 PM2017-09-28T21:53:56+5:302017-09-28T21:54:17+5:30

तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली.

Gram Panchayats start up | ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

Next
ठळक मुद्दे२५ सदस्य बिनविरोध : तीन जागा रिक्त, ४२४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली. सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट निवडणूक होत आहे. १९ सरपंचपदासाठी ७१ उमेदवार रिंगणात आहे, तर सदस्यांच्या १२९ जागांसाठी ३५३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. २५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर तीन जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.
जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका वणी तालुक्यात होत आहेत. त्यातही मोठमोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. १९ सरपंचपदासाठी ८३ अर्ज व १५७ सदस्यपदासाठी ३७५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती सरपंचपदासाठी ८३ व सदस्य पदासाठी ३६६ अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सरपंचपदाच्या १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ७१ उमेदवार थेट सरपंचपदाची निवडणूक लढवित आहेत, तर सदस्यपदातील १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ३५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यांपैकी २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. यामध्ये पुरड (नेरड) येथील सहा, अहेरी येथील पाच, वरझडी येथील पाच, वारगाव येथील चार, कळमना येथील तीन, तर केसुर्ली व चारगाव येथील प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. निर्जन असलेल्या अहेरी गावामध्ये फक्त सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. पाच सदस्य अविरोध आले आहेत, तर दोन जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत. पुरड (नेरड) येथे पहिल्यांदाच सहा जागा अविरोध ठरल्या आहेत. आता केवळ सरपंच व एका सदस्यासाठी निवडणूक होत आहे. वरझडी ग्रामपंचायतीमध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. शिंदोला, कळमना, कुरई, रांगणा, अहेरी, केसुर्ली, चारगाव, बोर्डा येथे सरपंचपदासाठी दोनच उमेदवार रिंगणात आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी पक्ष पुढाºयांनी ताकद लावून प्रत्येक गावात आपल्या पक्षाचे समर्थक उमेदवार रिंगणात उतरविले आहे. बहुतांश गावांमध्ये भाजपा व शिवसेना या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसकडून ऐनवेळी कार्यकारिणीत बदल
काँग्रेसने ऐनवेळी तालुका कार्यकारिणीत बदल घडवून कात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनेक गावांमध्ये काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करता आली नाही. १९ पैकी अधिकाअधिक सरपंच आपल्या पक्षाचे निवडून आणण्यासाठी भाजपा व सेना नेत्यांनी कंबर कसली आहे. चिखलगाव, शिंदोला, कुरई, वेळाबाई, मंदर, गणेशपूर या गावांच्या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे. गावांमध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहेत.

Web Title: Gram Panchayats start up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.