सीटी स्कॅनसाठी ग्रामीणांची परवड

By admin | Published: July 21, 2014 12:23 AM2014-07-21T00:23:47+5:302014-07-21T00:23:47+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो.

Grameen Seeds for CT scan | सीटी स्कॅनसाठी ग्रामीणांची परवड

सीटी स्कॅनसाठी ग्रामीणांची परवड

Next

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो. येथील क्ष-किरण विभागात सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची परवड होत आहे. कोणीच वाली नसल्याने जायचे कोठे, असा प्रश्न रुग्णांसमोर निर्माण झाला आहे. येथे डॉक्टरांकडून कॉन्ट्रास हे औषध बाहेरून विकत आणायला लावले जाते. त्यानंतरच सीटी स्कॅन केला जातो.
यवतमाळ तालुक्यातील गणगाव येथील ज्योतिराम परसराम पवार यांना घशाचा त्रास असल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात तपासणी केली. येथील नाक-कान-घसा विभागातील डॉक्टरांनी तपासणी करून ज्योतिराम पवार यांना सीटी स्कॅन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी ज्योतीरामने नंबर लावला. त्या प्रमाणे त्याला सीटी स्कॅन विभागाकडून १८ जुलै ही तारीख देण्यात आली. ठरल्याप्रमाणे ज्योतीराम १८ जुलैला सकाळी रेडिओलॉजी विभागात पोहोचला. तेथे डॉक्टरांनी त्याला कॅनुला, कॉन्ट्राससाठी इंजेक्शन आणि सिरिन हे बाहेरून खरेदी करण्यास सांगितले. तब्बल हजार रुपयांची औषधी घेऊन ज्योतीराम रुग्णालयात आला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याने हे औषध घेतले. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी कॅनुला लावून इंजेक्शन देणार असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र कोणताच डॉक्टर फिरकला नाही. शेवटी संपूर्ण विभाग बंद झाल्याने आल्या पावली परत जाण्याची वेळ ज्योतिरामवर आली. या बाबत रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, असा प्रकार नियमित चालतो, तुम्हीही घराकडे जा, असा सल्ला त्याने दिल्याचे ज्योतीरामने ‘लोकमत’ला सांगितले.
सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची परवड होते. नेमका काय प्रकार आहे याबाबत विभाग प्रमुख डॉ.सातघरे यांच्याकडे विचारणा केली असता, सीटी स्कॅन करण्यापूर्वी कॉन्ट्रास लावताना नाक-कान-घसा विभागातील डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाला रिअ‍ॅक्शन येण्याची शक्यता राहते. त्यामुळे सहा तासापर्यंत रुग्णाला दाखल करून घेण्याचीही गरज पडते. त्यानंतरच कॉन्ट्रास देवून सिटी स्कॅन करता येते. यासाठीच नाक-कान-घसा विभागातील डॉक्टरांना कॉल करण्यात आला. परंतु दुपारी २ वाजेपर्यंत नाक-कान-घसाचे डॉक्टर आले नाही, असे रेडिओलॉजी विभाग प्रमुख
डॉ.सातघरे यांच्याकडून सांगण्यात आले. परिणामी ज्योतीरामचे
सिटी स्कॅन झाले नाही, असेही सांगितले.
या संपूर्ण प्रकारात ज्योतीरामला नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. रुग्णालयातील दोन विभागातच समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होते. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना या अन्यायाबाबत दाद कोठे मागायची, हेही माहीत नाही. सकाळी ९ पासून दुपारी २ पर्यंत थांबल्यानंतर ज्योतिराम गावाकडे हताशपणे परत गेला. गावातीलच व्यक्तीने ‘लोकमत’कडे तक्रार करण्यास सांगितल्यानंतर ज्योतिरामने आपली आपबिती कथन केली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Grameen Seeds for CT scan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.