तीन गावांत ग्रामसमाधान शिबिर
By admin | Published: September 19, 2015 02:22 AM2015-09-19T02:22:50+5:302015-09-19T02:22:50+5:30
नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी, खरडगाव, दोनद येथे ग्रामसमाधान शिबिर पार पडले. यावेळी गावातील कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, ...
पालकमंत्री : कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये
यवतमाळ : नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी, खरडगाव, दोनद येथे ग्रामसमाधान शिबिर पार पडले. यावेळी गावातील कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी नेर पंचायत समितीचे सभापती भारत मसराम, माजी सभापती परमानंद अग्रवाल, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार शरयू आढे, सरपंच बाळासाहेब पन्नासे, प्रभाकर अघम, गटविकास अधिकारी जी.एस.भगत यांच्यासह विविध विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
गावातील निराधार अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणे, अन्नसुरक्षेचा लाभ देणे, कुटुंबांकडे शौचालयाचे बांधकाम, घरकुल, पाणी पुरवठा यासह कुपोषणमुक्तीसाठी शिबिरातून प्रयत्न केले जात आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी असल्यास सादर कराव्या, असे पालकमंत्री म्हणाले. वीज जोडणी, ट्रान्सफार्मर, रेशनकार्ड, फेरफार, अतिक्रमण नियमाकूल करणे आदी प्रकारच्या तक्रारी व अर्ज ग्रामसमाधान शिबिरामध्ये सादर झाले होते. या तक्रारी वेळेत निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
ग्रामसमाधान शिबिरानिमित्त गावांमध्ये महिलांसह शालेय विद्यार्थी आणि बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रमही घेण्यात आला. त्याचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह नेर पंचायत समितीचे माजी सभापती परमानंद अग्रवाल तसेच सरपंचांनी त्या-त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. (स्थानिक प्रतिनिधी)