ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:22 PM2019-01-04T21:22:52+5:302019-01-04T21:23:55+5:30
दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ग्रामपंचायतीचा ‘चौकीदारच चोर’ निघाल्याचा आरोप करून सदस्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वसाधारण सभा सुरू झाली. या सभेत शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे भोंगळ कारभार सुरू असल्याचा प्रहार केला. वेडद ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणावर दोन वर्षांपासून कारवाई होत नसल्याबद्दल मोहोड, गजानन बेजंकीवार यांनी संताप व्यक्त केला. यानंतर स्वाती येंडे यांनी प्रोसिडींग चुकीचे लिहिल्याचा आरोप केला. अधिकारी सभागृहात चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुमित्रा कंठाळे, राम देवसरकर, जया पोटे, रुक्मिणी उकंडे, हितेश राठोड आदी सदस्यांनी सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
लखनसिंग राठोड यांनी दिग्रस तालुक्यातील साखरा, धानोरा, वाई लिंगी, लिंगी वाई ग्रामपंचायतीच्या सचिवाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत तब्बल एक कोटी ७९ लाख सात हजार ३३० रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला. संबंधित ग्रामसेवकाची संपत्ती जप्त करून सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामसेवकाने कुणाच्या भरवशावर हा भ्रष्टाचार केला, असा आरोपही त्यांनी उपस्थित केला. गावाचा चौकीदारच चोर असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडदे यांनी सदस्य ग्रामसेवकावर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अंकेक्षण करण्याचे आदेश दिले. चित्तरंजन कोल्हे, उषा काकडे यांनी राळेगाव तालुक्यातील वरध, झाडगाव, वाढोणाबाजार येथील आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली. अधिकारी पाहतो, चौकशी करतो, अशी उत्तरे देवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुटुंबनियोजनात जिल्हा माघारला
यावर्षी जिल्ह्याला १७ हजार २०० कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट होते. केवळ १६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सभेत सांगितले गेले. राम देवसरकर यांनी समाजकल्याणमधील अनागोंदी चव्हाट्यावर आणली. मंगला पावडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य सुविधेत विषबाधा प्रकरणाचा समावेश करण्याचा ठराव मांडला. अनिल देरकर यांनी पीएचसीच्या उद्घाटनाला बोलावले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. गुंज पीएचसीचे सहा वर्षानंतरही बांधकाम रखडल्याबद्दल महागाव सभापतींनी संताप व्यक्त केला. वणीच्या सभापती लिशा विधाते यांनी संचमान्यता चुकीची असल्याचा आरोप केला.