ग्रामसेवकांनी संयम बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:18 PM2018-03-16T23:18:53+5:302018-03-16T23:18:53+5:30
गावाच्या विकासात ग्रामसेवकांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांना दररोज अनेक ग्रामस्थ भेटतात. मात्र प्रशासकीय काम करतांना ग्रामसेवकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : गावाच्या विकासात ग्रामसेवकांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांना दररोज अनेक ग्रामस्थ भेटतात. मात्र प्रशासकीय काम करतांना ग्रामसेवकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.
येथील जिल्हा परिषद बचत भवनात शुक्रवारी जिल्ह्यातील २९ ग्रामसेवकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ग्रामसेवकांनी आपल्यातील सेवकाला निष्क्रिय होऊ देऊ नये. आपण शासकीय कर्मचारी असले तरी सेवक म्हणून काम केल्यास गावविकासाला ही वृत्ती पोषक ठरेल. ग्रामविकासाकरिता काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक प्रकारची माणसे भेटतात. मात्र काम करताना ग्रामसेवकांनी संयम बाळगणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात २०१५-१६ या वर्षाकरिता १३, तर २०१६-१७ करिता १६ ग्रामसेवकांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. मंचावर उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम सभापती निमिश मानकर, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, समाज कल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, सीईओ जलज शर्मा, अरुण मोहोड, चंद्रशेखर खंडारे, नारायण सानप आदी उपस्थित होते. डेप्युटी सीईओ राजेंद्र भुयार यांनी आभार मानले.