विजेच्या धक्क्याने आजी व नात ठार
By admin | Published: July 20, 2016 01:49 AM2016-07-20T01:49:00+5:302016-07-20T01:49:00+5:30
गावानजीकच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी व नातीचा जीवंत वीज ताराच्या स्पर्शाने मृत्यू झाला तर मुलगा
दहागावची घटना : नाल्यावर तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श, मुलगा गंभीर
उमरखेड : गावानजीकच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी व नातीचा जीवंत वीज ताराच्या स्पर्शाने मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता घडली.
पंचफुला रामराव जाधव (५५), समीक्षा रंगराव जाधव (१०) असे मृत आजी आणि नातीचे नाव आहे. तर रंगराव रामराव जाधव (३२) असे गंभीर जखमीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता पंचफुलाबाई नात समीक्षासह गावालगत असलेल्या लोणाडी नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या. त्यावेळी तुटलेल्या जीवंत वीज ताराचा स्पर्श पंचफुलाबाई आणि समीक्षाला विजेचा जबर धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार नाल्यावर असलेल्या महिलांना दिसला. त्यांनी हा प्रकार गावात जाऊन सांगितला. त्यावेळी पंचफुलाचा मुलगा रंगराव धावत आला. त्याने या दोघींना उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जबर धक्का बसला. गावकऱ्यांनी या तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पंचफुला व समीक्षाला डॉक्टरांंनी मृत घोषित केले. तर बेशुद्धावस्थेत असलेल्या रंगरावला उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून या वीज तारा तुटलेल्या होत्या. वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रारही करण्यात आली होती. परंतु दखल घेतली गेली नाही. परिणामी आज दोघांचा बळी गेला. या प्रकरणाला वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप करीत उमरखेड पोलीस ठाण्यात मारोतराव जाधव यांनी तक्रार दाखल केली. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
दरम्यान गावकऱ्यांनी वीज वितरणवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. माजी आमदार विजय खडसे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निवळला. (शहर प्रतिनिधी)
सणाच्या दिवशी चुल पेटलीच नाही
४वर्षातील पहिला सण आखाडी मंगळवारी असून याच दिवशी गावात भीषण घटना घडली. त्यामुळे गावात कुणाच्याही घरी चुल पेटली नाही. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. समीक्षा ही गावातील शाळेत चौथ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी होती. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.