आजीच्या निधनाने नात झाली पोरकी
By Admin | Published: June 14, 2014 02:31 AM2014-06-14T02:31:13+5:302014-06-14T02:31:13+5:30
आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आजीच्या आश्रयाने राहणाऱ्या एका बालिकेचे अखेरचे छत्रही नियतीने हिरावून घेतले.
नेर : आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आजीच्या आश्रयाने राहणाऱ्या एका बालिकेचे अखेरचे छत्रही नियतीने हिरावून घेतले. पाणी-पाणी करीत आजीने बुधवारी प्राण
सोडला आणि चिखली येथील भावना पोरकी झाली.
भावना मनोज तिवारी असे या नातीचे नाव आहे. चिखली कान्होबा येथील पंचफुला सदाशिव वैद्य (७०) या आजीच्या आधाराने ती राहत होती. पंचफुलाची मुलगी कल्पना
हिचा विवाह मनोज तिवारी यांच्यासोबत झाला होता. काम धंद्याच्या शोधात दोघेही मुंबई येथे गेले. मात्र कल्पनाच्या जीवनात अंधार लिहून ठेवलेला होता. दीर्घ आजारात
मनोजचा मृत्यू झाला. त्यावेळी कल्पनाच्या पोटात भावना वाढत होती. पती निधनानंतर कल्पना यवतमाळात आली. मिळेल ते काम करून राहू लागली. दरम्यान कन्यारत्न
प्राप्त झाले. भावना असे मुलीचे नावही ठेवण्यात आले. मात्र नियतीला हेही मान्य नव्हते. भावना एक वर्षाची असताना कल्पनाचा मृत्यू झाला. मातृपित्रू छत्र हरविल्याने आजी
पंचफुलाबाईने तिला आश्रय दिला. नातीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे ती जपत होती. सत्तरी उलटलेली पंचफुलाबाई मोडक्या झोपडीत राहून नातीचा सांभाळ करीत होती. मात्र
बुधवारी नियतीने पुन्हा डाव साधला. शेतात गेलेल्या पंचफुलाबाईचा उन्हाच्या तडाख्यात मृत्यू झाला. भावना खऱ्या अर्थाने पोरकी झाली. (तालुका प्रतिनिधी)