ना उम्र की सीमा हो... वय झाल्यावरही सिद्ध केली गुणवत्ता!
By अविनाश साबापुरे | Published: May 7, 2024 05:51 PM2024-05-07T17:51:28+5:302024-05-07T17:52:47+5:30
जिल्ह्यात ११ हजार प्रौढ झाले साक्षर : नव भारत साक्षरता परीक्षेचा निकाल जाहीर
यवतमाळ : चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कोणताही शुभमुहूर्त पाहायचा नसतो. शिकण्यासाठी तर नाहीच नाही. हीच बाब ओळखून जिल्ह्यातील प्रौढ निरक्षरांनी यंदा आयुष्यात पहिल्यांदा शिक्षणाचे धडे गिरविले. त्यांची परीक्षा होऊन सोमवारी निकालही आला. अन् आश्चर्य ! १२ हजार ४५२ निरक्षरांपैकी तब्बल ११ हजार २७१ निरक्षर यात उत्तीर्ण झाले. अर्धे वय उलटून गेले, हातांना थरथरी, अनेकांची दृष्टीही अधू झालेली, पण अशाही आव्हानांना सामोरे जात या प्रौढांनी गुणवत्ता सिद्ध करून जिल्ह्याची मान उंचावली आहे.
१५ वर्षे आणि त्यापुढील प्रौढांसाठी यावर्षी जिल्ह्यात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात आला. सुरुवातीला अनेक अडथळे आले, तरी नंतर मात्र या मोहिमेने चांगलाच वेग घेतला. शिक्षण विभाग आणि शिक्षकांची मेहनत फळाला आली. त्यातून तब्बल १२ हजार ४५२ प्रौढ निरक्षरांना साक्षरतेचे धडे देऊन १७ मार्च रोजी त्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत १५० पैकी ४९.५ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते. राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात जिल्ह्यातील प्रौढांनी उत्तम कामगिरी करीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेत कुणालाही अनुत्तीर्णचा शेरा दिला गेलेला नाही, तर ४९.५ गुण न घेऊ शकलेल्या प्रौढांना ‘सुधारणा आवश्यक’, असा शेरा देऊन त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. आता १२ हजारांपेक्षा अधिक प्रौढांनी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान व अन्य व्यावहारिक कौशल्यात यश मिळविले असून, त्यांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका मिळणार आहे, तसेच त्यांना मुक्त विद्यालय मंडळातर्फे पाचवी, आठवी अशा शालेय परीक्षांना बसता येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रौढांची कामगिरी
परीक्षार्थी : १२,४५२
उत्तीर्ण : ११,२७१
सुधारणा आवश्यक : ११८१
उत्तीर्ण / सुधारणा आवश्यक
पुरुष : ३५९३ / २९४
महिला : ७६७८ / ८८७
एकूण : उत्तीर्ण : ११,२७१ / ११८१
वयोगटानुसार उत्तीर्ण परीक्षार्थी
१५ ते ३५ वर्षे : ११९४
३६ ते ६५ वर्षे : ६२५१
६६ वर्षांपुढील : ३८२६
प्रवर्गनिहाय उत्तीर्ण प्रौढ
एससी : १२२१
एसटी : ३५३१
ओबीसी : ५४५७
अल्पसंख्यक : २९७
जनरल : ७६५
नव भारत साक्षरता कार्यक्रमात झालेल्या परीक्षेत आपल्या जिल्ह्यातील ११ हजारांपेक्षा अधिक प्रौढ उत्तीर्ण झालेत, तर पुढच्या वर्षीसाठी आपले शिक्षक, स्वयंसेवक अधिक मेहनत घेतील. जोमात काम करतील आणि याहीपेक्षा अधिक प्रौढांना साक्षर करतील.
- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ
राज्याच्या निकालात जिल्हा कितवा?
जिल्हा : उत्तीर्ण प्रौढ
जळगाव ३६८४२
नाशिक २४९८२
गडचिरोली २४६४४
चंद्रपूर २४१८२
अमरावती २३६३८
नांदेड १८१७६
अकोला १८०८०
सोलापूर १७४३२
नंदूरबार १५८०५
परभणी १४६५६
छत्रपती संभाजीनगर १४६००
ठाणे १३०७७
रत्नागिरी १२७९१
पालघर १२६२४
बीड ११९६६
मुंबई ११८८०
यवतमाळ ११२७१
जानला ११११०
बुलडाणा : १०४४७
धुळे १०१७६
पुणे ९०४२
वाशिम ८९७४
हिंगोली ८७५८
अहमदनगर ८४०१
गोंदिया ८३७६
भंडारा ८२२२
सांगली ७४२७
रायगड ६९९४
नागपूर ६७६२
धाराशिव ३९११
सातारा ३८५७
लातूर ३०२९
कोल्हापूर २२८५
वर्धा १२६४
सिंधुदुर्ग २२५