रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक
By सुरेंद्र राऊत | Published: December 3, 2023 06:58 PM2023-12-03T18:58:10+5:302023-12-03T18:58:21+5:30
शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली.
यवतमाळ: मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आजीकडे पैसे मागितले. आजीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने चवताळलेल्या नातवाने ७४ वर्षाच्या आजीचा गळा घोटला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही गंभीर घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणकापूर येथे शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली.
शिंदूबाई भरत कोवते (७४) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा नातू महेश विश्वास कोवते (२५) याने आजी सोबत वाद घालून त्यांचा गळा आवळला. यात जागेवरच आजीचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार शिंदूबाई यांची मुलगी सुधा मनोहर ठाकरे यांनी बघितला. या प्रकरणी सुधा ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला बाभूळगाव पोलिसांनी रविवारी अटक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. बाभूळगाव पोलिसांना गुन्हे तपासाबाबत मार्गदर्शन केले.