मारुबिहागने सुरेल झालेली उत्कट सायंकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2015 02:53 AM2015-11-26T02:53:14+5:302015-11-26T02:53:14+5:30

मारूबिहाग म्हणजे सायंकाळी गायिला जाणारा राग. शुद्ध मध्यमची या रागातली मजा काही वेगळीच. उत्कटता आणि व्याकुळता व्यक्त करणारा मारूबिहाग

The great evening of Marubihagan surrendered | मारुबिहागने सुरेल झालेली उत्कट सायंकाळ

मारुबिहागने सुरेल झालेली उत्कट सायंकाळ

Next

कौशिकी चक्रवर्ती यांनी रंगविली मैफल : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ स्वरांजली
यवतमाळ : मारूबिहाग म्हणजे सायंकाळी गायिला जाणारा राग. शुद्ध मध्यमची या रागातली मजा काही वेगळीच. उत्कटता आणि व्याकुळता व्यक्त करणारा मारूबिहाग त्याच्या खास वेळेत ऐकण्याचा योग म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच. ही पर्वणी यवतमाळकर रसिकांनी अनुभवली. ज्येष्ठ गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन, सायंकाळ आणि उत्कटतेने भारलेले वातावरण असा हा समां यावेळी जुळून आला.
लोकमतचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलाल दर्डा यांच्या १८ व्या स्मृतिप्रीत्यर्थ कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाचे आयोजन यवतमाळ येथील प्रेरणास्थळ येथे करण्यात आले. याप्रसंगी कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांची दाद घेतली. बाबुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या मैफिलीला बाबुजींचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबूजींच्या आठवणीत कौशिकी यांनी छेडलेल्या मारुबिहागने बाबुजींच्या आठवणींनाही अधिक गडद केले. त्यांनी गायनाचा प्रारंभच मारूबिहागने करून या रागाची औचित्यपूर्णता साधली. प्रेरणास्थळावरचे प्रसन्न वातावरण, एकत्रित आलेले दर्दी रसिक आणि मारूबिहागचे गायन असा योग जुळला असताना आकाशातला चंद्रही या प्रसंगाचा साक्षी झाला. बाबुजींची प्रसन्न हसरी मुद्रा असलेले छायाचित्र त्यांची आठवण ताजी करणारे होते. या कार्यक्रमाला लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पष्ट उच्चार, ताना - आलपींची बरसात आणि तीनही सप्तकात सहजपणे संचार करणारा आवाज हे कौशिकी चक्रवर्ती यांचे वैशिष्ट्य आहे. त्याची प्रतिती त्यांच्या गायनातून आली. सरगम सादर करताना मुरकी घेण्याची त्यांची पद्धत तर लाजवाब होती. ‘मितवा कैसे आऊ तुमरो पास...’ हा मोठा ख्याल त्यांनी विलंबित सादर करून रसिकांची दाद घेतली. यानंतर त्यांनी ‘पिया बिन मोरा जिया..’ ही चीज द्रुत लयीक सादर करून आपल्या गानक्षमतेचा परिचय दिला. ठुमरी, दादरा गायनासाठी लोकप्रिय असलेल्या कौशिकी यांना रसिक सोडणार नव्हतेच.
आपण बाबुजींच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रथमच यवतमाळ येथे सादरीकरणासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळकरांच्या चोखंदळ रसिकतेला दाद देत त्यांनी रसिकांची मागणी पूर्ण करताना मिश्र तिलंग मध्ये एक ठुमरी सादर केली. ‘सावरा रे...तोरे नैना जादुभरे...’ या ठुमरीने त्यांनी रसिकांना जिंकले. ठुमरी सादर करताना मूळ रागाची ठेवण हळुवार पेरत त्यांनी ही ठुमरी खुलविली. कौशिकी चक्रवर्ती यांच्यासारखी गायिका आणि ठुमरीचा विषय असताना बडे गुलाम अली खाँ यांच्या ‘याद पिया की आए...’ती फर्माईश झाली.
रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी ही रसिली ठुमरी सादर करून गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर संदीप घोष, संवादीनीवर अजय जोगळेकर आणि तानपुऱ्यावर रेणुका इंदुरकर व मेघोदीपा यांनी साथसंगत केली. सर्व कलावंतांचे स्वागत खा. विजय दर्डा यांनी केले.

Web Title: The great evening of Marubihagan surrendered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.