उपेक्षितांसाठीचे कार्य महान पुण्यकर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:39 PM2018-03-30T23:39:44+5:302018-03-30T23:39:44+5:30
समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे महान पुण्यकर्म आहे. विधूर, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता यांचा वधू-वर परिचय मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरणारा आहे,....
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे महान पुण्यकर्म आहे. विधूर, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता यांचा वधू-वर परिचय मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी केले.
निर्मिक महिला विकास मंडळ, निवृत्त अभियंता मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा येथे निवृत्त अभियंता भवनात घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद अजमिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, गोपाळ भास्करवार, नीरज डफळे, भारत सोधी, सतीश भोयर, महादेव कोडापे, गजानन भांडवलकर, प्रा. काशीनाथ लाहोरे आदी उपस्थित होते.
समाजामध्ये स्वार्थी प्रवृत्ती बोकाळली आहे. समाजसेवासुद्धा आजकाल काही तरी मिळविण्याच्या हेतूने केली जाते. परंतु उपेक्षितांचे लग्न जुळवून त्यांना सामाजिकदृष्ट्या भक्कम आधार देऊन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आयोजित हा मेळावा नक्कीच आदर्शवत आहे, असे राजुदास जाधव यावेळी म्हणाले. माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांनीही आयोजकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
मेळाव्याचे आयोजक नरेश उन्हाळे यांनी प्रास्ताविक केले. १२ वर्षात १३६ विधवा, घटस्फोटित, अपंग मुला-मुलींचे लग्न लाऊन दिल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी मेळाव्यात विवाहबद्ध झालेल्या काही जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विजय साबापुरे यांनी केले. महिलांचा परिचय प्रा. सविता हजारे यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.