लाखो सौरदिव्यांतून जग करणार महात्मा गांधींना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:39 PM2019-08-30T12:39:07+5:302019-08-30T12:40:43+5:30
भारतासह १८० देशातील लाखो विद्यार्थी एकाच वेळी स्वत:च्या हाताने सौरदिवे तयार करून महात्मा गांधींना कृतिशिल अभिवादन करणार आहेत.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अहिंसेचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५० वी जयंती यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जगभरात साजरी होणार आहे. भारतासह १८० देशातील लाखो विद्यार्थी एकाच वेळी स्वत:च्या हाताने सौरदिवे तयार करून महात्मा गांधींना कृतिशिल अभिवादन करणार आहेत.
पर्यावरणाची हानी टाळणे हीदेखील एकप्रकारची अहिंसाच आहे, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यासाठी मुंबई आयआयटीने सुरू केलेल्या ‘गांधी जागतिक सौरयात्रा’ मोहिमेला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे.
येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त भारतीय तंत्रज्ञान संस्थेतर्फे खास शालेय विद्यार्थ्यांसाठी सौरदूत कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. भावी पिढीला हवामान बदलाबाबत जागृत करणे, पर्यावरण जतन आणि संरक्षण या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे अशा हेतूने गांधी जागतिक सौरयात्रा मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेचा मुख्य कार्यक्रम म्हणून २ ऑक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये एकाच वेळी ‘विद्यार्थी सौरदूत कार्यशाळा’ घेतली जाणार आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या हाताने कमीत कमी एक सौरदिवा तयार करणार आहे. तो कसा तयार करावा, याबाबत कार्यशाळेतच मार्गदर्शन केले जाणार आहे. हा दिवा तयार करण्यासाठी ५०० ते ५५० रुपयांचे साहित्य लागणार असून ते विद्यार्थ्यांनी स्वत: आणायचे आहे. शिवाय सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यासाठी १० रुपयांचे शुल्कही भरावे लागणार आहे.
या कार्यशाळेत ११ वर्षे व त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांना सहभागी करण्याचे निर्देश विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड(पुणे) यांनी सोमवारी दिले.
गिनिज बुकात नोंद
विशेष म्हणजे, २ ऑक्टोबर २०१८ पासूनच मुंबई आयआयटीने ही मोहीम सुरू केली. २०१८ मध्ये अशाच प्रकारे सौरदूत कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी देशातील दीड लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या उपक्रमाची गिनिज बुकात जागतिक विक्रम म्हणून नोंदही घेण्यात आली. आता २०१९ मधील कार्यशाळा तब्बल १८० देशात राबविली जात आहे. त्यामुळे नवा विक्रम स्थापित होण्याची शक्यता आहे.