किराणा दुकान म्हणजे नशापाणीचे ठिकाण नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:00 AM2022-02-16T05:00:00+5:302022-02-16T05:00:34+5:30
नफाखोरी करण्यासाठी किराणा दुकानातून नशापाणी करणाऱ्या वस्तू विक्री करून येणाऱ्या पिढीला बिघडवायचे नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करताना अशा वस्तू विकल्या तर दुकानाची बदनामी होईल आणि नशापाणी करणारे लोक दुकानात येतील. यामुळे नफा तर सोडाच, अधिक नुकसान होईल आणि सर्वसामान्य नागरिक दुकानात येण्यापासून दूर जातील.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने किराणा दुकानामधून वाईन विक्री करण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय सध्या तरी निघालेला नाही. मात्र, या निर्णयाविरोधात राज्यभरात संताप नोंदविला जात आहे. किराणा व्यावसायिकांनीही या निर्णयावर रोष व्यक्त केला आहे.
नफाखोरी करण्यासाठी किराणा दुकानातून नशापाणी करणाऱ्या वस्तू विक्री करून येणाऱ्या पिढीला बिघडवायचे नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करताना अशा वस्तू विकल्या तर दुकानाची बदनामी होईल आणि नशापाणी करणारे लोक दुकानात येतील. यामुळे नफा तर सोडाच, अधिक नुकसान होईल आणि सर्वसामान्य नागरिक दुकानात येण्यापासून दूर जातील. यामुळे दुकान आणि माॅलमधून वाईन विक्री करणे योग्य नाही, याबाबत सरकारने फेरविचार करावा, असे मत किराणा व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. मॉल चालकांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.
बदनामीच जास्त
किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यासाठी शासनाचा आदेश निघणार होता. या आदेशामुळे सरकारची मोठ्या प्रमाणात नाचक्की होत आहे. किराणा दुकानात असे वाईन विकले तर लोक येणार नाहीत.
अध्यादेश निघालाच नाही
राज्य शासनाने किराणा दुकानातून वाईन विकण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, त्याचा आदेश निघाला नाही. यामुळे सध्या तरी या ठिकाणावर किराणा मालच मिळणार आहे. याशिवाय वाईन विक्री करायची की नाही, याबाबतचा निर्णय दुकानदाराला घ्यायचा आहे.
किराणा दुकानदार म्हणतात...
वाईन विक्री करणे यासाठी किराणा दुकान उघडलेले नाही. या ठिकाणी छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण खरेदीकरिता येत असतो. वाईन विकली तर ते नशापाणीचेच दुकान होईल. अशा प्रकाराला आम्ही मान्य करणार नाही.
- नंदलाल मंगतानी
हे शक्य नाही, अती उच्च दर्जाच्या व्यक्तींसाठी वाईनसारखा प्रकार विक्रीला येतो. यातून महसूल मिळावा, हा उद्देश आहे. मात्र, आम्हाला जीवनावश्यक वस्तूच विकायच्या आहे. यामुळे किराणा दुकानातून अशा वस्तू विकल्या जाणार नाही.
- रितेश ठाकरे