साता जन्माची गाठ बांधायला नवरदेवाचा चक्क नदीच्या पुरातून प्रवास, धडाक्यात पार पडले लग्न
By सुरेंद्र राऊत | Published: July 15, 2022 04:53 PM2022-07-15T16:53:11+5:302022-07-15T18:44:00+5:30
प्रेमासाठी काय पण म्हणत नदीच्या पुरातून सात किलोमीटर प्रवास करीत पोहोचला नवरदेव, नांदेड जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यात आली वरात. नवरदेवासह वऱ्हाडीही थर्माकोलच्या शीटवर बसून लग्न घरी पोहोचले.
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : दोन महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील कोराडी येथील युवकाचा यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चिंचोली येथील मुलीशी लग्न जुळले. विवाहाचा मुहूर्त ठरला. १५ जुलैला लग्न व १४ जुलैला हळदीचा कार्यक्रम होता. नदीला पूर असल्याने वाहतुकीचे कुठलेच साधन उपलब्ध नव्हते. अशाही स्थितीत लग्नासाठी वाट्टेल ते म्हणत, त्या नवरदेवाने नदीच्या पुरातून सात किलोमीटर प्रवास करीत आपल्या नववधूचे घर गाठले. विशेष म्हणजे वऱ्हाडीही थर्माकोलच्या शीटवर बसून लग्न घरी पोहोचले. धडाक्यात हळदीचा कार्यक्रम करण्यात आला. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रवास सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
नांदेड जिल्ह्यातील कोराडी येथील शहाजी राकडे याचा विवाह उमरखेड तालुक्यातील चिंचोली येथील गायत्री गोंगाडे यांच्याशी एक महिन्यापूर्वी ठरला. मात्र, सहा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीसह नदी नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. नववधूच्या घरी जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने नदीच्या पुरातून जाण्याचा निर्धार केला.
मासेमारीसाठी वापरतात त्या थर्माकोलच्या शीटचा आधार घेवून नवरदेव व त्याच्याकडील मोजके नातेवाईक नववधूच्या घरी गुरुवारी १४ जुलैला पोहोचले. हळदीचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी विवाह सोहळा पार पडला आहे. शहाजी राकडे याने मोठे धैर्य दाखवित नदीचा पूर पार करुन आपल्या नववधूसाठी परीक्षाच दिली. या आगळ्यावेगळ्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.