जिल्ह्याची भूजल पातळी घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:11 PM2018-05-19T23:11:25+5:302018-05-19T23:11:25+5:30
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिलीमीटर आहे. गतवर्षी ५६२.९३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के आहे. अपुऱ्या पावसाने भूजलाची पातळी कमालीची घसरली. मार्चमध्ये भूजल पातळी -१ मिटर होती. आता भूजल सर्वेक्षण विभागाने मान्सूनपूर्व पातळी जाहीर केली. त्यात १६ तालुक्यांतील १८१ निरीक्षण विहिरी आणि ६४ पाणलोट क्षेत्रात भूजल पातळीत मोठी घट दिसून आली. यापूर्वी २००९ मध्ये ४७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी भूजल पातळी - २ अंशावर पोहोचली होती. २०१८ मध्ये भूजल पातळी -२.२१ ने खाली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची स्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.
धरणाचा ‘कॅचमेंट एरिया’ वगळता जिल्ह्यातील दोन हजार १३६ गावांची भूजल पातळी सरासरी -२.२१ मिटरने खाली गेली आहे. याचा फटका सर्व तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्याकरिता ही धोक्याची घंटा आहे.
निळोणा, चापडोहचा जलसाठा संपला
निळोणा आणि चापडोह हे प्रकल्प गतवर्षी भरले नाही. यामुळे वेळेपूर्वीच जलप्रकल्पातील जलसाठा संपला. यानंतर या प्रकल्पामधील मृत साठा वापरण्यात आला. आता तोही संपला आहे. प्रारंभी चापडोह प्रकल्पातील जलसाठा संपला आणि शनिवारी निळोणा जलाशयातील साठा संपला. तसे फलकच जीवन प्राधिकरणाने आपल्या कार्यालयाबाहेर लावले आहे.
अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्पांतील पाणी आटले. सध्या मोठ्या जलाशयात सरासरी ९.६० टक्के पाणी शिल्लक आहे. यामध्ये पूस प्रकल्पात १२.१२ टक्के, अरूणावती ४.९० टक्के, बेंबळा ११.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.८५ टक्के, तर लघु प्रकल्पांत ११.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पांपैकी दुरूग, उमर्डा, दत्तापूर, सिंगनडोह, अर्जुना, एकलारा, वारणा, राजूर, कुंभारकिन्ही, हातोला, लोहतवाडी, नेर, दुधाना, झटाळा, अंतरगाव, म्हैसदोडका, बोरडा, निंगनूर, अंबोना, सेनद, दराटी, मुडाणा, तरोडा, पोफाळी आदी २५ प्रकल्प कोरडे पडले आहे.