सहा हजार हेक्टरवरील पीक झाले भुईसपाट
By admin | Published: February 8, 2016 02:38 AM2016-02-08T02:38:19+5:302016-02-08T02:38:19+5:30
वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे.
यवतमाळ : वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे. यवतमाळ वन विभागात आतापर्यंत दोन हजार ८४५ हेक्टरवरील उभे पीक नष्ट केले आहे. गत पाच वर्षातील हे सर्वात मोठे नुुकसान आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे हे प्रमाण ६ हजार हेक्टरवर आहे.
अवैध वृक्षतोडीने वनसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्यप्राण्यांनी गाव आणि शेतशिवाराकडे धाव घेतली. यातून शेतीचे गणित बिघडले आहे. वन्यप्राण्याच्या दहशतीने शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
किडीचे आक्रमण, अवेळी आलेला पाऊस आणि वातावरणाच्या बदलापाठोपाठ वन्यप्राण्याच्या हल्ल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याचा अल्प मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही रक्कम पिकांचे नुकसानही भरून काढू शकत नाही.
पिकांच्या नुकसानीपोटी वनविभाग शेतक ऱ्यांना १००० रूपयापासून १० हजारापर्यंत मदत देणार आहे. नुकसान ८० टक्के असल्यास २५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र वनविभागाने पंचनामे करून १००० ते १५०० रूपयांच्याच मदतीची शिफारस केली आहे. यातून बियाण्याचा खर्च निघणे कठीण झाले आहे. (शहर वार्ताहर)
जंगलालाच कुंपण करण्याची मागणी
रोही, रानडुक्कर, कोल्हे, हरीण यासह विविध वन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक नष्ट करण्यास सुरूवात केली. हे प्राणी शेतशिवारात शिरू नये म्हणून जंगलालाच कुंपण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र हा खर्च न परवडणार आहे. यामुळे वनविभागाने या पर्यायाला नकार दिला आहे.
असा आहे जिल्ह्याचा अहवाल
वन्यप्राण्याच्या धुमाकुुळाने २०१० मध्ये ३९८८ हेक्टरचे नुकसान केले. २०११ मध्ये ४४१४ हेक्टर, २०१२ मध्ये ५८७ हेक्टर, २०१३ मध्ये ८७३ हेक्टर, २०१४ मध्ये ५४६ हेक्टर, २०१५ मध्ये यवतमाळ वनवृत्त २८४६ हेक्टर, जिल्हा क्षेत्र ६००० हेक्टर आहे. वन्यप्राण्याने ४६ जनावरांची शिकार केली. या हल्ल्यात एका इसमाचा बळी गेला.