जिल्ह्यातून बढती, संधी कुणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:53 PM2018-10-03T23:53:37+5:302018-10-03T23:54:14+5:30

गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधले जात आहे.

Growth from the district, opportunity? | जिल्ह्यातून बढती, संधी कुणाला ?

जिल्ह्यातून बढती, संधी कुणाला ?

Next
ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तार : आता १० आॅक्टोबरचा मुहूर्त, सर्वांचाच दावा आणि फिल्डींग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधले जात आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या ‘प्लस-मायनस’च्या चर्चाही ऐकायला मिळत आहे.
आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिवेशनाच्या आधी व अधिवेशनाच्या नंतर असे कित्येक मुहूर्त टळले आहे. आता पुन्हा घटस्थापनेचे औचित्य साधून १० आॅक्टोबरचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेतील इच्छुकांना व ज्यांनी सरकारचा कारभार अगदी जवळून पाहिला अशा राजकीय अभ्यासूंना तर आता विस्ताराच्या कोणत्याच मुहूर्तावर विश्वास राहिलेला नाही. परंतु तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका व राज्य सरकारला उरलेले अवघे एक वर्ष बघता हा मुहूर्त आता अखेरचा असल्याने त्यावर विश्वास ठेवला जात आहे. अखेरची संधी म्हणून इच्छुकांनी पुन्हा एकदा जोरदार फिल्डींग लावली आहे.
जिल्ह्यात भाजपाकडून मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड राज्यमंत्री आहेत. त्या दोघांनाही बढती मिळण्याची अपेक्षा आहे. आशावादी असलेल्या या दोघांनीही कॅबिनेटसाठी आपल्या गॉडफादरकडे मोर्चेबांधणी चालविल्याची माहिती आहे. भाजपाला कॅबिनेट मिळाल्यास जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व वाढणार व सेनेला मिळाल्यास त्यांचे वर्चस्व वाढणार हे राजकीय गणित आहे. नेमके हेच गणित दोन्ही पक्षाकडून श्रेष्ठींकडे मांडले जात आहे. राठोडांचे ‘मातोश्री’वर जेवढे वजन आहे तेवढेच किंवा त्या पेक्षा अधिक जिव्हाळा ‘वर्षा’वर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सेनेकडून कॅबिनेटच्या यादीत नाव आल्यास ‘वर्षा’वरूनही ते आणखी उचलून धरले जाण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांमध्ये सेनेला रोखण्यासाठी भाजपाला कॅबिनेट मंत्रिपद कसे उपयोगी पडू शकते हे श्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न येथील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून केला जातो आहे.
दोन्ही मंत्र्यांच्या बढतीसोबतच जिल्ह्यातून आणखी कुणाला विस्तारात संधी मिळते का याकडेही नजरा लागल्या आहेत. त्यात नवनियुक्त विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांचे नाव अग्रक्रमावर घेतले जाते. नाईक घराण्यातील वारसदाराला मंत्रिपद देऊन त्याचे भाजपासाठी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मार्केटिंग करून घेण्याचा मनसुबा असल्याचे सांगितले जाते. त्यांना कृषी, जलसंधारण या सारख्या खात्यांचे राज्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आदिवासी समाजाचा विचार झाल्यास विदर्भातून राळेगावचे भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना संधी दिली जाऊ शकते. उच्चशिक्षित, नम्र व सोबर चेहरा म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी विदर्भातील आदिवासी समाजाच्या राज्यमंत्र्याला डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र एका जिल्ह्यातून किती जणांना संधी हा विषयही तेवढाच महत्वाचा आहे. अन्य आमदारही आपल्याला संधी दिली जाऊ शकते असा दावा करीत आपले गणित कार्यकर्त्यांपुढे मांडताना दिसत आहेत. मात्र त्यांचे भाग्य फळफळते की नाही, हे प्रत्यक्ष विस्ताराच्या दिवशीच स्पष्ट होईल.
शेजारच्या आमदाराला कॅबिनेटची शक्यता
इकडे यवतमाळच्या शेजारील चांदूररेल्वे-धामणगावात अरुण अडसड यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. फुंडकरांच्या कृषिमंत्री पदाची चर्चा असलीतरी निवडणुकीचे वर्ष असल्याने बदनामीच्या भीतीने हे पद विदर्भात न ठेवता पश्चिम महाराष्ट्रात दिले जावे, असा भाजपातील सूर आहे. तसे झाल्यास अडसड यांना महसूल सारखे वजनदार खाते देऊन त्यांची दमदार एन्ट्री केली जाऊ शकते. त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात पक्षासाठी करून घेतला जाऊ शकतो.

Web Title: Growth from the district, opportunity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.