श्रेयासाठी पालकमंत्री कुरघोडी करतात

By admin | Published: May 24, 2016 12:08 AM2016-05-24T00:08:57+5:302016-05-24T00:08:57+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री म्हणून कुठलेही योगदान संजय राठोड यांनी दिले नाही.

Guardian minister cries for Shreya | श्रेयासाठी पालकमंत्री कुरघोडी करतात

श्रेयासाठी पालकमंत्री कुरघोडी करतात

Next

पत्रपरिषद : काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप
यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री म्हणून कुठलेही योगदान संजय राठोड यांनी दिले नाही. केवळ शासकीय योजनांचा आलेला निधी विकासासाठी आपण आणल्याचे दाखवून श्रेय लाटले जात आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांवर श्रेयासाठी कुरघोडी सुरू आहे, असा आरोप काँग्रेस जिल्हा परिषद सदस्यांनी पत्रपरिषदेत केला.
पालकमंत्री स्वत:ची निष्क्रियता लपविण्यासाठी योजनांसाठी नियोजित निधीच आपण आणल्याची शेखी मिरवित आहे. दलितवस्ती, तांडावस्ती सुधार योजना, तेरावा वित्त आयोग, चौदावा वित्त आयोग, पाणीपुरवठ्याच्या योजना, जनसुविधेचा निधी, ग्रामीण रस्त्यांसाठी असलेला ३०:५४ चा निधी, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधी इतकेच काय तर, रोजगार हमी योजनेतील कामांचे भूमिपूजन पालकमंत्री स्वत:च्या नावाने करीत आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील विविध योजनांची कामे या सर्वांचा मिळून ३५० कोटी रुपयांचा विकास निधी दिग्रस-दारव्हा मतदारसंघात आणल्याचे ते सांगत आहे. हा निधी पालकमंत्री नसतानाही मिळणार होता. शासनाकडून कुठलाच विशेष निधी पालकमंत्र्यांनी मिळवून दिला नाही.
शिरजगाव पांढरी या गावात तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून पूर्ण केली. श्रेयासाठी पालकमंत्र्यांनी त्याचे आता भूमिपूजन केले आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी सभागृहात बाजू मांडून खेचून आणलेल्या कामांचे पालकमंत्री भूमिपूजन करीत आहेत. पालकमंत्र्यांनी पातळी सोडली असून वैयक्तिक शौचालय योजनेच्या कामाचेही भूमिपूजन केले जात आहे. अधिकाऱ्यांना धमकावून सर्वत्र पालकमंत्र्यांच्या नावाचे बोर्ड लावण्यात येत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जासाठी वणवण फिरत आहे. जिल्हा बँकेने २० दिवसांपासून पीककर्ज वाटप बंद केले आहे. यावर बोलण्यासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही. दुसरीकडे आर्णी मार्गावर असलेल्या एका फेब्रिकेटर्सला भूमिपूजनाचे तीन हजार बोर्ड बनविण्याची आॅर्डर दिली आहे. यावरून पालकमंत्री कोणत्या मानसिकतेचे आहे हे दिसून येते. जिल्ह्यातील प्रमुख समस्या दुर्लक्षित करून आता पालकमंत्री महाआरोग्य शिबिराच्या नावाने रुग्णसेवेचा आव आणण्यासाठी धडपडत आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक सुविधा नसताना पालकमंत्री केवळ राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेचा वापर करीत आहे. शासनाकडून मदतीच्या नावाने छदामही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तर दुसरीकडे पालकमंत्री स्वत: पोसलेल्या कंत्राटदारांकडून सत्कार करून घेत आहे.
दारव्हा-दिग्रस-नेर येथे पालकमंत्र्यांचा कंत्राटदारांनी नागरी सत्कार केला आहे. ही धूळफेक जनतेला लक्षात येणारी आहे, असा आरोप काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, भीमराव राठोड, पंढरीनाथ सिंहे यांनी केला आहे. पत्रपरिषदेला नितीन मिर्झापुरे, संतोष चव्हाण, जगनराव पाटील आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

सरकारी यंत्रणेचा होत आहे वापर
नेर ठाणेदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ

शेतातील मोटारपंप चोरी गेला अशी तक्रार घेऊन उदापूर येथील शेतकरी उमेश रामदास सांगळे हा नेर पोलीस ठाण्यात पोहोचला. येथील ठाणेदाराने तक्रार नोंदवून घेण्याऐवजी शेतकऱ्यालाच शिवीगाळ करून मोटारपंप रोज ने-आण करण्याचा अजब सल्ला दिला. हा प्रकार सदर शेतकऱ्याने पालकमंत्री संजय राठोड यांना सांगितला. मात्र त्यांनीही याची दखल घेतली नाही. उलट जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी प्रथम ठाणेदाराच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप रामदास सांगळे यांनी पत्रपरिषदेत केला. घरची दुभती म्हैस विकून सहा महिन्यांपूर्वी २४ हजारांचा पंप खरेदी केला होता. मोटार पंप नसल्याने भुईमूग आणि कांदा ही दोन्ही पिके वाळली, अशी आपबिती या शेतकऱ्याने पत्रपरिषदेत सांगितली.

पाणीटंचाईकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील व यवतमाळ शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पालकमंत्री स्वत: उदो-उदो करण्यातच व्यस्त आहे. अर्जूना येथे पाणीटंचाईने एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी घेतला. त्यानंतरही पालकमंत्र्यांनी त्या गावात जाऊन साधी भेट देण्याची तसदी घेतलेली नाही. एकीकडे टंचाईची समस्या गंभीर होत असताना पालकमंत्री केवळ भूमिपूजनातच खूश आहे. यवतमाळ शहरातील पाणीटंचाईवर पालकमंत्री का बोलत नाही, हे कोडे आहे. नागरिकांमध्ये याबाबत रोष आहे.

Web Title: Guardian minister cries for Shreya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.